पूरग्रस्तांना मोफत रक्तपुरवठा करणार, शाहू ब्लड बँकेचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 07:28 PM2019-08-13T19:28:43+5:302019-08-13T19:29:25+5:30
रक्तातील पीसीव्ही, एफएफपी व आरडीपी या घटकांच्या रक्त पिशवीची किंमत प्रत्येकी १५०० रुपये आहे.
कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापूरातील सामान्य जनता धावून आली असताना आता त्यांना मोफत रक्तपुरवठा करण्यासाठी येथील शाहू ब्लड बँक ही पुढे सरसावली आहे. परंतू त्यासाठी तरुणाईने रक्तदान करण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येण्याचे आवाहन मंगळवारी येथे बँकेच्या पदाधिका-यांनी केले. महापुरानंतर मुख्यत: डेंग्यू, लेप्टोप्लायरेसीचे रुग्ण वाढू शकतात व त्या रुग्णांना रक्ताची गरज भासते हे लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी दिली.
रक्तातील पीसीव्ही, एफएफपी व आरडीपी या घटकांच्या रक्त पिशवीची किंमत प्रत्येकी १५०० रुपये आहे. रक्तावरील प्रक्रिया खर्चच ७०० रुपये असून तो ब्लड बँक स्वत: सोसणार आहे. हे रक्त मोफत पुरविले जाणार आहे. फक्त त्यासाठी संबंधित डॉक्टर्सनी रुग्ण पूरग्रस्त आहे असे पत्र देण्याची आवश्यकता आहे. ही सेवा ब्लड बँकेत २४ तास सुरु राहील.
मोफत रक्तपुरवठा करायचा असेल तर त्यासाठी रक्तसंकलनही होणे आवश्यक आहे. म्हणून गुरुवार १५ आॅगस्टपासून चंदूकाका सराफ दुकानाच्या मागील बाजूस रक्तदान शिबीरांचे सकाळी ११ ते ५ या वेळेत आयोजन केले आहे. कुणी मंडळांने पुढाकार घेतला तर तिथे जावून रक्तदान शिबीर घेतले जाईल. कोल्हापूरातील लोक जसे मदतीसाठी धावून आले तसेच रक्तदानासाठी पुढे आले तरच पूरग्रस्तांना मोफत रक्तपुरवठा करता येईल. त्यामुळे गणेशोत्सव मंडळे, विविध संस्था-संघटना,कार्यकर्ते यांनी रक्तदानासाठी पुढे यावे.
अधिक माहितीसाठी प्रशासन अधिकारी अमर पाटील (मो-९३७०५०३०२१) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षता पवार, शेतकरी संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील भुयेकर, मानसिंगराव जाधव, ब्लड बँकेचे सचिव बाबाभाई वसा, संचालक राजू दोशी, राजेंद्र देशिंगे, महेंद्र परमार आदी उपस्थित होते.
एसडीपी रक्त सवलतीत
सिंगल डोनर प्लेटलेटस (एसडीपी) रक्ताच्या पिशवीची किंमत ११ हजार रुपये आहे. या रक्तावरील प्रक्रिया खर्चच ८ हजार रुपये आहे. त्यामुळे हे रक्त मोफत दिले जाणार नाही. त्यावर दहा टक्के सवलत दिली जाणार आहे.