‘शाहू चरित्रग्रंथ’ आता इटालियन भाषेत
By admin | Published: October 12, 2015 12:17 AM2015-10-12T00:17:39+5:302015-10-12T00:28:18+5:30
अॅलेस्सांड्रा कोन्सोलॅरो करणार अनुवाद : शिवाजी विद्यापीठ-तुरीन विद्यापीठात करार
कोल्हापूर : ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘राजर्षी शाहू चरित्रग्रंथ’ आता इटालियन भाषेत प्रसिद्ध होणार आहे. इटलीतील तुरीन विद्यापीठातील हिंदी विषयातील विदूषी डॉ. अॅलेस्सांड्रा कोन्सोलॅरो या ग्रंथाचा इटालियन भाषेत अनुवाद करणार आहेत.शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभाग आणि इटलीतील तुरीन विद्यापीठाशी सामंजस्य करार झाला आहे. या अंतर्गत डॉ. अॅलेस्सांड्रा कोन्सोलॅरो यांनी गेल्या महिन्यात शिवाजी विद्यापीठाला भेट दिली. यावेळी हिंदी विभागप्रमुख डॉ. पद्मा पाटील यांनी डॉ. जयसिंगराव पवार लिखित आणि हिंदीत अनुवादित केलेला ‘राजर्षी शाहू चरित्रग्रंथ’ दाखविला. हा ग्रंथ पाहून डॉ. कोन्सोलॅरो प्रभावित झाल्या. शिवाय त्यांनी स्वत:हून संबंधित ग्रंथ इटालियन भाषेत अनुवादित करण्याची तयारी दाखविली.
तसेच शाहू संशोधन केंद्रात जाऊन डॉ. पवार यांच्याशी शाहूचरित्रावर चर्चा केली. (प्रतिनिधी)
महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या माध्यमातून आतापर्यंत शाहू चरित्रग्रंथ हिंदी, कन्नड, कोकणी, उर्दू, तेलगू, इंग्रजी व जर्मन भाषांमध्ये प्रसिद्ध झाला आहे. गुजराती, सिंधी, रशियन भाषांतील अनुवाद प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. यात आता इटालियन भाषेतील अनुवादाचीही भर पडणार आहे. इटालियन भाषेतील हा ग्रंथ सुमारे तीनशे पानांचा असणार आहे. येत्या वर्षभरात त्याची निर्मिती होईल. त्याचा सर्व खर्च प्रबोधिनीतर्फे केला जाणार आहे.
- प्रा. डॉ. जयसिंगराव पवार,
ज्येष्ठ इतिहास संशोधक
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाला इटलीतील तुरीन विद्यापीठातील हिंदी विषयातील विदूषी डॉ. अॅलेस्सांड्रा कोन्सोलॅरो यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांना ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी ‘शाहू चरित्रग्रंथ’ प्रदान केला. यावेळी शेजारी प्रा. डॉ. पद्मा पाटील उपस्थित होत्या.