Shahu Chhatrapati 75th birthday: शाहू छत्रपतींना 'ही' भीती होती, परंतू..; संभाजीराजेंनी सांगितला खासदारकीबाबतचा किस्सा
By समीर देशपांडे | Published: January 7, 2023 12:58 PM2023-01-07T12:58:12+5:302023-01-07T13:15:24+5:30
ती मिठी मी कधीही विसरू शकत नाही
आमचे राजघराणे. त्यात आणि मी थोरला. त्यामुळे माझ्या एकूणच वाटचालीकडे अगदी आतासुध्दा बारीक लक्ष असते. मी तिसरी ते आठवी राजकोटला शिकलो. त्यावेळी बाबा मला सोडायला यायचे. ते परत जाताना मला मिठीत घ्यायचे. त्यानंतर हळूहळू मोठा होत गेलो. एकूणच त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त भीती असल्याने नंतरच्या काळात त्यांनी मिठीत घेणं झालं नाही. पण तो क्षण पुन्हा अनेक वर्षांनी आला. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार झाल्यानंतर. माझी नियुक्ती झाली होती. मी बाहेरून आलो. पॅलेसवर जल्लोष चालला होता आणि मी आल्या आल्या बाबांनी मला मिठीत घेतलं. ही मिठी मी कधीही विसरू शकत नाही.
आम्ही राजघराण्यातील आहोत म्हणून त्यांनी कधीही मला किंवा मालोजींना वेगळी वागणूक कुठेच दिली नाही. तुम्ही सर्वांसारखेच आहात हे त्यांनी पहिल्यापासून बिंबवले. त्यामुळे मी सेंट झेविअर्सला असताना पुण्यासह अनेक ठिकाणी सामने खेळायला एस. टी. तून गेलो आहे म्हणून मी आज जेव्हा राज्यभर फिरतो, वेळ पडली तर शेतातच जेवतो. घोंगडे टाकून झोपतो. त्याच्यामागे बाबांची शिकवण आहे. मी पट्टीचा पोहतो. पण मला आताच्या माझ्या कार्यालयासमोर बाबांचे कार्यालय होते. तेथे वर एक खोल पाण्याची टाकी होती. त्यात दोरी सोडून मला पहिल्यांदा बाबांनी पोहायला शिकवलं. माझी भीती घालवली नंतर मी तलावात शिकलो.
माझ्या खासदारकीच्या निवडणुकीवेळी त्यांनी मला उमेदवारी मिळाल्यानंतरही तुम्ही उभे राहू नका, असा सल्ला दिला होता. अर्थात तो मी मानला नाही. पराभव झाला; परंतु समाजासाठी काहीतरी करत राहा हा बाबांचाच संदेश घेऊन मग मी राज्यभर बाहेर पडलो. राष्ट्रपती नियुक्त खासदार झाल्यानंतर संसदेच्या कामकाजापुरता भाजपला पाठिंबा देण्यासाठी मी सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. हे त्यांना खटकले. परंतु या पदाच्या जोरावर मी दिल्लीत शिव शाहू विचार प्रभावीपणे मांडण्यापासून ते रायगडाच्या विकासासाठी भरीव काही तरी करू शकलो हे देखील वास्तव आहे.
वेगळ्या वाटेने जाणार नाही..
मी सहयोगी सदस्यत्व स्वीकारल्यानंतरच्या मी पुढे काय निर्णय घेतो याची त्यांना वैचारिक परंपरेतून भीती होती; परंतु तसे काही मी करणार नाही, असाही विश्वास माझ्याकडून त्यांना मिळाला आहे. राजघराण्याचे संस्कार आणि बाबा यांच्यामुळेच आजचा हा संभाजी छत्रपती घडला आहे एवढे निश्चित.
- संभाजीराजे छत्रपती (शब्दांकन.. समीर देशपांडे )