दिल्लीमध्ये ‘शाहू छत्रपती’ प्रदर्शन लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:37 AM2017-11-06T00:37:34+5:302017-11-06T00:40:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : करवीर संस्थानचा अभिजात भारतीय लघुचित्रशैलीच्या माध्यमातून मांडलेला इतिहास थक्क करतो. ‘युनाते’चे कलाकार अभिनंदनासाठी पात्र आहेत. म्हणूनच हेच प्रदर्शन लवकरच दिल्लीमध्ये आयोजित केले जाईल, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे यांनी रविवारी दिली. येथील युनाते क्रिएशन्सच्या वतीने आयोजित केलेल्या ‘शाहू छत्रपती’ प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
येथील शाहू स्मारक भवनमध्ये या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये शिवाजी महाराजांपासून शाहू छत्रपती यांच्यापर्यंत अनेकांची काढलेली चित्रे मांडण्यात आली आहेत.
दरम्यान, प्रदर्शनातील काही कलाकृती देशभरातील विविध खासदारांना दिल्या जातील. तसेच कोल्हापुरात सुसज्ज कलादालनासाठी लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून द्या. तो मंजूर करून आणला जाईल, असेही संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.
प्राचार्य अजेय दळवी म्हणाले, राजस्थानमध्ये शाहू महाराजांची छायाचित्रांखाली केवळ ‘महाराजा’ असे लिहून ती विकली जातात आणि परदेशातील लोक ती खरेदी करतात. ही बाब लक्षात आल्यानंतर शाहू महाराजांनाच भारतीय लघुचित्रशैलीत सर्वांसमोर आणणे आवश्यक असल्याचे वाटले. तसे मत व्यक्त केल्यानंतर या विद्यार्थ्यांनी कष्टपूर्वक या कलाकृती साकारल्या आहेत.
प्रतीक्षा व्हनबट्टे, आकाश झेंडे, शुभम चेचर, दुर्गा आजगावकर, अभिषेक संत, पुष्पक पांढरबळे, अनिशा पिसाळ यांच्या कलाकृतींचा समावेश असून, प्रदर्शन ११ नोव्हेंबरपर्यंत खुले राहणार आहे. राजर्र्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सोनतळी येथे दरबारी चित्रकार दत्तोबा दळवी यांच्या पुढाकाराने भेट झाली होती. काही वर्षांपूर्वी संशोधनातून ही माहिती पुढे आली. मात्र, या प्रदर्शनाच्या निमित्ताने ही भेट पहिल्यांदाच चित्रबद्ध झाली आहे. यावेळी डॉ. नलिनी भागवत, विजय टिपुगडे, सागर बगाडे, आदी उपस्थित होते.