कागदावरील बेरजा मतात, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात तोच रंगणार गुलालात
By विश्वास पाटील | Published: May 6, 2024 01:17 PM2024-05-06T13:17:15+5:302024-05-06T13:17:53+5:30
शाहू छत्रपती-मंडलिक यांचे कशाच्या जोरावर विजयाचे दावे?
विश्वास पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांची कोल्हापूर उत्तर, दक्षिण, करवीर विधानसभा मतदार संघांवर जास्त मदार आहे. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना कागल, राधानगरी आणि चंदगडचा जास्त आधार आहे. त्यांच्या समर्थकांकडूनही त्याच बळावर विजयाचे दावे केले जात आहेत. आता कागदावर केल्या जाणाऱ्या बेरजा प्रत्यक्षात मतात कितपत उतरतात हेच महत्त्वाचे आहे.
- गेल्या निवडणुकीत मंडलिक यांना ७ लाख ४९ हजार ८५ मते मिळाली. त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांना ४ लाख ७८ हजार ५१७ मते मिळाली. लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत महाडिक विजयी झाले होते. त्यांना करवीर, कोल्हापूर दक्षिण आणि राधानगरी मतदार संघाने मताधिक्य दिले होते. चंदगड, कागल आणि कोल्हापूर उत्तरने मंडलिक यांना पाठबळ दिले होते. या निवडणुकीत एकट्या करवीर मतदार संघाने महाडिक यांना ३४ हजार ५७९ चे मताधिक्य दिले आणि महाडिक ३३२५९ मतांनी विजयी झाले होते.
- गेल्या निवडणुकीत मात्र सर्व सहाही मतदार संघांत मंडलिक यांना मताधिक्य होते. त्यामध्ये शहरी मध्यमवर्गीय मतदारांत पंतप्रधान मोदी यांच्याबद्दलची क्रेझ, सतेज पाटील यांनी महाडिक यांच्या विरोधात घेतलेली आक्रमक भूमिका, पुलवामाच्या हल्ल्यानंतर तयार झालेली भावनिक वातावरण या गोष्टी मताधिक्क्य देण्यास कारणीभूत ठरल्या.
- मंडलिक यांच्या उमेदवारीबद्दल, संपर्काबद्दल, विकासकामांच्या पाठपुराव्याबद्दल पहिल्या दोन निवडणुकीत जे प्रश्न उपस्थित करण्यात आले, तेच या निवडणुकीतही कायम आहेत.
- गेल्या निवडणुकीत महाडिक यांना त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडून येऊन भाजपशी घरोबा केल्याचा मुद्दा जास्त अडचणीचा ठरला. किंबहुना महाडिक यांचा पराभव महाडिक यांनीच केला. मूळ त्यांना दोन्ही काँग्रेसनेच मनापासून स्वीकारले नाही ते जेव्हा स्विकारले तेव्हा २०१४ ला मोदींची लाट असतानाही ते विजयी झाले होते. कारण उमेदवार म्हणून ते उजवे होते.
- आताच्या निवडणुकीचा विचार केल्यास मंडलिक यांना कागलकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत. कारण त्या तालुक्याच्या राजकारणातील तीन प्रमुख गट त्यांच्यासोबत आहेत. हे मंडलिक घराण्याचे होम पीच आहे.
- चंदगडला दिवंगत मंडलिक यांचे जावई आमदार आहेत शिवाय विरोधातील शिवाजी पाटील, भरमू पाटील हे गटही सोबत आहेत. या गटांची ताकद असल्याने तिथे मताधिक्य मिळेल असे त्यांना वाटते.
- राधानगरी मतदारसंघात आमदार प्रकाश आबिटकर व त्यांच्या विरोधातील माजी आमदार के. पी. पाटील गट मंडलिक यांच्यासोबत असल्याने तिथेही हमखास मताधिक्कय मिळेल असे त्यांचे गणित आहे.
- शाहू छत्रपती यांच्यासाठी कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि करवीर हे मतदार संघ जास्त महत्त्वाचे आहेत. व्यक्तिगत त्यांची उमेदवारी, छत्रपती घराण्याबद्दलचा आदर या गोष्टी फारच निर्णायक ठरणाऱ्या आहेत.
- दलित, मुस्लिमांसह इतर समाजघटकांचे पाठबळ आपल्या पाठीशी असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे.
- कोल्हापूर शहरात त्यांचा व्यक्तिगत संपर्क चांगला आहे. संस्था, संघटनांशी संबंध आहेत. आमदार, माजी नगरसेवकांचे नेटवर्क, उद्धवसेनेबद्दल सहानुभूती असणारा मतदार आहे.
- करवीरमध्ये आमदार पी.एन. पाटील आणि आमदार सतेज पाटील यांची ताकद आहे. या दोघांनी एकूणच निवडणूक ते स्वत: उमेदवार असल्याप्रमाणे हातात घेतली आहे. कोल्हापूर दक्षिणमध्येही काँग्रेसचे नेटवर्क चांगले आहे. तिथे ऋतुराज पाटील आमदार आहेत.
- चंदगड, कागल, राधानगरीतील कोण नेते कागदावर बेरजेला कुणाकडे असले तरी सर्वच सहाही मतदार संघांतील सामान्य जनता आपल्यासोबत असल्याचे आणि मतदारांचा हा अंडर करंट सभेतून जाणवत असल्याचे महाविकास आघाडीला वाटते. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची एकजूट जास्त एकजिनसी झाल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे.