प्रागतिक विचारासाठी शाहू छत्रपतींनी पुढाकार घ्यावा, शरद पवार यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 01:50 PM2024-02-21T13:50:07+5:302024-02-21T13:50:22+5:30

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे स्मारकाचे थाटात लोकार्पण

Shahu Chhatrapati should take initiative for progressive thinking, Sharad Pawar appeal | प्रागतिक विचारासाठी शाहू छत्रपतींनी पुढाकार घ्यावा, शरद पवार यांचे आवाहन 

प्रागतिक विचारासाठी शाहू छत्रपतींनी पुढाकार घ्यावा, शरद पवार यांचे आवाहन 

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले असोत, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर, या सगळ्यांनी देशासमोर प्रागतिक विचार ठेवला. उपेक्षित समाजाला ऊर्जा दिली. आज असाच प्रागतिक विचार नव्याने पुढे घेऊन जाण्यासाठी कोल्हापूरच्या शाहू छत्रपती यांच्याकडून सर्वसामान्य जनतेला अपेक्षा आहेत. त्यास जनतेचे आशीर्वाद असतील. त्यांनी पुढाकार घेतल्यास कोल्हापूरचा प्रागतिक विचार महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यांत जाईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मंगळवारी रात्री येथे व्यक्त केली.

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या प्रतिभानगरातील स्मारकाचे लोकार्पण मंगळवारी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती हाेते. व्यासपीठावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव डी. राजा, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, भालचंद्र कांगो, आमदार सतेज पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर होते.

राजर्षी शाहू महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांनी देशाला नेहमीच दिशा दिली. शाहू छत्रपती महाराजांकडूनही हा विचार जपला जाईल, म्हणून जनतेला त्यांच्याबद्दल अपेक्षा आहेत. म्हणूनच मला शाहूराजेंना विनंती करायची आहे, त्यांनी या कामात पुढाकार घ्यावा, असे आवाहन करून पवार यांनी शाहू छत्रपतींनी लोकसभेची निवडणूक लढवावी, असे अप्रत्यक्ष जाहीरच करून टाकले.

पवार म्हणाले, सत्ता सर्वसामान्यांसाठी वापरायची असते, ही भूमिका शाहू महाराजांनी जपली; परंतु ज्यांच्या हातात देशात सत्ता आहे, त्यांना जरासुद्धा सर्वसामान्य जनतेविषयी आस्था नाही. जनतेच्या प्रश्नावर चर्चा करायची असते, अशा लोकसभेत देशाचे पंतप्रधान केवळ वीस मिनिटांसाठी आले. पुन्हा त्यांनी ढुंकूनसुद्धा पाहिले नाही. आज देशात लोकांना भलतीकडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेचा चुकीचा वापर केला जात आहे. विरोधात भूमिका मांडणाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत. वृत्तवाहिन्या बंद करण्याचा आदेश काढला जातो आहे. सत्तेविरोधात बोलणाऱ्या मंत्र्यांना तुरुंगात टाकण्याचे काम केले जात आहे. हे रोखण्यासाठी संघटित होण्याची गरज आहे.

विचाराने लढण्याची गरज : शाहू महाराज

शाहू महाराज म्हणाले, ‘देशाची घटना इतकी मजबूत आहे की, ती कोणीही मोडू शकणार नाही. तीच देशाला पुढे घेऊन जाणार आहे. आज महाराष्ट्र अस्वस्थ आहे, अस्थिर आहे. इतका अस्थिरपणा मागच्या ७५ वर्षांत कधीही झाला नाही. पक्षांतर्गत कायदा कमी पडला किंवा त्यास बगल देऊन सत्ता हस्तगत करू शकतो हे दाखविण्याचा प्रयत्न गेल्या दीड- दोन वर्षांत झाला. पक्षांतर का होते, हे आता सगळ्यांना माहीत आहे. प्रतिगामी शक्तीविरोधात, आवाज दडपणाऱ्यांविरोधात आज विचाराने लढायची वेळ आली आहे. कुठे तलवार घेऊन लढायला जायची गरज नाही. त्याची सुरुवात कोल्हापुरातून होऊ शकते. आपणाला दिशा ठरवावी लागेल.

Web Title: Shahu Chhatrapati should take initiative for progressive thinking, Sharad Pawar appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.