विशाळगडावरील हिंसाचाराच्या घटनेने शाहू छत्रपती गलबलले, हिंसाचारग्रस्तांना आधार देण्यासाठी घेतला पुढाकार 

By भारत चव्हाण | Published: July 17, 2024 01:00 PM2024-07-17T13:00:15+5:302024-07-17T13:00:33+5:30

भारत चव्हाण कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मागणीसाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने उभारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने खासदार शाहू ...

Shahu Chhatrapati upset by the incident of violence at Vishalgad | विशाळगडावरील हिंसाचाराच्या घटनेने शाहू छत्रपती गलबलले, हिंसाचारग्रस्तांना आधार देण्यासाठी घेतला पुढाकार 

विशाळगडावरील हिंसाचाराच्या घटनेने शाहू छत्रपती गलबलले, हिंसाचारग्रस्तांना आधार देण्यासाठी घेतला पुढाकार 

भारत चव्हाण

कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मागणीसाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने उभारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने खासदार शाहू छत्रपती गेल्या तीन दिवसांपासून प्रचंड अस्वस्थ असल्याचे पहायला मिळाले. दंगलीचे वृत्त कळताच मुंबईला जात असलेले शाहू छत्रपती पुण्यातून कोल्हापूरला परतले आणि प्रत्येक घटनेवर त्यांनी लक्ष ठेवत हिंसाचारग्रस्तांना मानसिक आधार देण्यासाठी पुढाकार घेतला. मंगळवारी त्यांनी गजापूर येथे जाऊन नागरिकांशी संवाद साधत एक मुलीच्या अंगावर स्वत:चे जॅकेटही घातले. या कृतीतून त्यांच्या हळव्या मनाची प्रचिती आली.

विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात आंदोलन पुकारल्यानंतर शाहू छत्रपती यांची भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी संयमाने घ्यावे, अशीच होती. हिंसाचार घडण्यापूर्वी पाच दिवस आधी शाहू छत्रपती यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना फोन केला. ‘या आंदोलनाची गांभीर्याने दखल घ्या. समाजमाध्यमावरून आवाहन केले जात आहे. काही तरी वेगळे घडेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधितांशी चर्चा करा, माझी आवश्यकता असेल तर मलाही बोलवा’, अशी सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.

त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संभाजीराजे यांच्याशी फोनवर संपर्क करून चर्चेला येण्याचे आवाहन केले. पण, संभाजीराजे यांनी ते ऐकले नाही. शेवटी जिल्हाधिकारी येडगे न्यू पॅलेसवर गेले. त्यांनी तुम्हीच संभाजीराजेंना समजवा, असे सांगितले. परंतु, संभाजीराजे तेथे नव्हते. म्हणून शाहू छत्रपतींनी संभाजीराजेंशी फोनवर चर्चा केली. दीड वर्षे मी मागणी करतोय कोणीच काही करत नाही, मला कोणी तरी शब्द द्यावा, असे संभाजीराजे सांगत होते. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा घडवून आणण्याचा विषय झाला, परंतु पुढे काही झाले नाही.

मुकेश अंबानी यांच्या पुत्राच्या रिसेप्शनला उपस्थित राहण्यासाठी रविवारी सकाळी शाहू छत्रपती मुंबईला जात होते. परंतु, वाटेत त्यांना विशाळगड हिंसाचाराची बातमी समजली. त्यावेळी त्यांनी पुण्यातूनच मागे फिरण्याचा निर्णय घेतला. रविवारी सायंकाळी ते पॅलेसवर पोहोचले. त्यांनी सर्व माहिती घेतली, काही व्हिडीओ पाहिले तेव्हापासून शाहू छत्रपती अस्वस्थ झाले. जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरुन परिस्थितीची माहिती करून घेतली.

सोमवारी सकाळी त्यांनी सर्वप्रथम या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आणि विशाळगडावर जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, काही सहकाऱ्यांनी त्यांना परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असून, उद्या जाऊया, असे सांगून थांबविले. मनात प्रचंड घालमेल सुरू असल्याने त्यांनी रविवारी दुपारचे जेवणही घेतले नाही. त्यांच्या सोबत असणाऱ्या मालोजीराजे, मधुरिमाराजे, व्ही. बी. पाटील यांनी त्यांना काही तरी खाण्याचा आग्रह धरला. त्यावेळी त्यांनी हलकासा नाष्टा घेतला. सायंकाळी इंडिया आघाडीची बैठक बोलाविली.

मंगळवारी त्यांनी विशाळगडावर जात असताना सोबत अन्नधान्य घेऊन गेले. महिला, पुरुष यांच्याशी जवळून संवाद साधत त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग जाणून घेतला. हा दुर्दैवी प्रसंग त्या कुटुंबावर नाही तर आपल्या स्वत:वरच ओढवलेला आहे, अशा विषन्न मनाने ते महिलांचे म्हणणे जाणून घेत होते. सगळा प्रकार ऐकून शाहू छत्रपती गलबलून गेले. या घटनेला आपल्या घरातील एका सदस्याच्या आंदोलनामुळे हे घडले याचे अतीव दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होते. पण, सर्व समाज आपला आहे, त्यांचे दु:ख हे आपले आहे, असे समजून त्यांनी हिंसाचारग्रस्त कुटुंबीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Shahu Chhatrapati upset by the incident of violence at Vishalgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.