Kolhapur lok sabha result 2024: गड आला पण सिंह गेला; स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांच्या योगदानाबद्दल शाहू छत्रपतींची कृतज्ञता
By भारत चव्हाण | Published: June 4, 2024 07:37 PM2024-06-04T19:37:54+5:302024-06-04T19:42:11+5:30
''एकंदरीत मतदारांना पाहिजे होते तेच झाले''
कोल्हापूर : माझा विजय हा जनतेचा विजय आहे. या निवडणुकीत मतदारांनी ठरविले होते तेच घडले आहे. या विजयात ज्यांनी मोठी भूमिका बजावली ते आमदार पी. एन. पाटील आज आपल्यात नाहीत. ते आज हा विजय पाहण्यास असायला पाहिजे होते. गड आला पण सिंह गेला याचे दु:ख आहे, अशा शब्दात कोल्हापूरच्या जनतेबरोबरच स्वर्गीय आमदार पी. पाटील यांच्या योगदानाबद्दल शाहू छत्रपती यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शाहू छत्रपती म्हणाले की, हा विजय जनतेचा, छत्रपती शिवाजी, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा विजय आहे. एकंदरीत मतदारांना पाहिजे होते तेच झाले आहे. जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती. सर्वच विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी भरभरून प्रेम व्यक्त केले आहे. आपल्या विजयात आमदार सतेज पाटील, आमदार पी.एन. पाटील यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह सर्व डावे पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठे योगदान आहे. त्यांचे आभार मानणे माझे कर्तव्य आहे, असे शाहू छत्रपती म्हणाले.
दीड लाखांवर मताधिक्य
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी दीड लाखांवर मताधिक्य घेत बाजी मारली. ७१ हजारावर करवीर विधानसभा तर ६५ हजारहून अधिक राधानगरी विधानसभा मतदारसंघाने दिलेले मताधिक्यच छत्रपतींना गुलाल लावणारे ठरले.