कोल्हापुरातील शाहू सांस्कृतिक मंदिर ४५ वर्षांतच कमकुवत, नवीन बांधकामाकडे समितीचा कानाडोळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 04:26 PM2024-08-14T16:26:44+5:302024-08-14T16:27:19+5:30

दोन वर्षे भंगारात पडल्यासारखी अवस्था 

Shahu Cultural Temple in Kolhapur weak in 45 years Committee's neglect of new construction | कोल्हापुरातील शाहू सांस्कृतिक मंदिर ४५ वर्षांतच कमकुवत, नवीन बांधकामाकडे समितीचा कानाडोळा 

छाया-आदित्य वेल्हाळ

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मालकीचे शाहू सांस्कृतिक मंदिर गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. दिवसाला लाखो रुपये भाड्याच्या रुपाने देणारी वास्तू सध्या भंगारात पडल्यासारखी आहे. स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार ते वापरण्यास योग्य नसल्याचे सांगण्यात येते. पण, ४५ वर्षांतच इमारत कमकुवत कशी झाली? दोन वर्षांपूर्वी ‘पंचरत्न’कडून हस्तांतरण होईपर्यंत सुस्थितीत होती मग, लगेच वापरण्यास अयोग्य कशी? उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली वास्तूबाबत एवढी अनास्था का? राजकीय हस्तक्षेपामुळे संचालक मंडळाने त्याबाबत निर्णयच घेतला नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्याने कोल्हापुरात शहरात तेवढ्या किंवा त्यापेक्षा जास्त आसन क्षमतेचे सभागृह कुठे? यावर चर्चा झाल्यानंतर बाजार समितीचे एक हजार आसन क्षमतेचे भव्य शाहू सांस्कृतिक सभागृह समोर येते. पण, त्याची अवस्था खूपच वाईट झाली आहे. मुख्य रस्त्याला लागून मोक्याची प्रशस्त जागा असताना गेली दोन वर्षे सभागृह भंगार अवस्थेत पडल्याचे पाहून कोल्हापूरकरांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

झाड्याच्या फांद्यानी इमारत गेली झाकून 

  • समितीने १९७४ ला दोन एकर जागेत सांस्कृतिक सभागृह व आखाडा उभा करण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षात मे १९७९ मध्ये त्याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते सहकार मंत्री एन. डी. पाटील व कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांच्या उपस्थित झाले होते.
  • पार्किंगसह नेटके नियोजन करून वास्तू उभारली होती. साधारणता वीस वर्षे समितीने त्यातून चांगले उत्पन्न मिळविले. मात्र, २००१ ला ‘पंचरत्न’ या फर्मला वार्षिक एक लाख भाड्याने दिले. दर तीन वर्षांनी मूळ भाड्यात १५ टक्के वाढ करण्याचा करार झाला होता.
  • ‘पंचरत्न’ने थोडीसी डागडुजी करून तब्बल २१ वर्षे वापरली आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांची मुदत संपल्यानंतर समितीने ताब्यात घेतले तेव्हापासून ते बंदच असून इमारतीवर झाडे-झुडपे उगवली असून झाड्याच्या फांद्यानी ‘शाहू सांस्कृतिक’ झाकून गेले आहे.


मग ४५ वर्षांतच कमकुवत झाले कसे?

शाहू सांस्कृतिकचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर १९८४ मध्ये वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयातील तज्ज्ञांकडून ऑडिट करून घेतले होते. बाल्कनीत वाळूची पोती भरून त्याची क्षमता तपासण्यात आली. इमारतीसाठी वापरलेले साहित्य व त्याची मजबुती पाहता या इमारतील किमान शंभर वर्षे काही होणार नसल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते, मग ४५ वर्षांतच वापरण्यास अयोग्य कशी झाली? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.

नव्याने बांधायचे ठरवले तर हा पर्याय..

  • शॉपिंग गाळे उभा करून, संबंधितांकडून डिपाॅझीट घेऊन त्यातून काही निधी उपलब्ध करणे
  • काही रक्कम समितीच्या स्वभांडवलातून घालणे
  • उर्वरित रक्कम कर्जाऊ घेणे

Web Title: Shahu Cultural Temple in Kolhapur weak in 45 years Committee's neglect of new construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.