शाहू विचार जपणारे शाहू दयानंद हायस्कूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:42 AM2019-05-13T00:42:11+5:302019-05-13T00:42:18+5:30
संदीप आडनाईक । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लंडनच्या प्रवासात राजर्षी शाहू महाराजांची ईडरचे राजे प्रतापसिंग यांच्याशी भेट झाली, ...
संदीप आडनाईक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लंडनच्या प्रवासात राजर्षी शाहू महाराजांची ईडरचे राजे प्रतापसिंग यांच्याशी भेट झाली, तेव्हा सर्वप्रथम आर्य समाज आणि स्वामी दयानंद सरस्वती यांच्या कामाशी त्यांचा संबंध आला. स्वामी दयानंद सरस्वती यांनी १८८५ मध्ये आर्य समाजाची स्थापना केली.
गरीब आणि वंचित वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण देण्याच्या हेतूने शाहू महाराज यांनी हे आर्य समाजाचे काम कोल्हापुरात सुरू केले. राजाराम कॉलेजसह आर्य समाज गुरुकुल वसतिगृह, शाहू दयानंद फ्री एडस स्कूलसारख्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था डॉ. बाळकृष्ण यांच्या ताब्यात दिल्या. जुन्या इमारतीसह ४८ एकर जागा महाराजांनी यासाठी दिली. येथील मुलांना शिक्षण आणि वसतिगृहासाठी आर्थिक तरतूदही केली. संस्थेसाठी दिलेल्या गवती कुरणातून मुलांना सकस दूधही मिळत असे. शाहू महाराज स्वत: याकडे लक्ष देत आणि राहतही असत. संस्थाने विलीन झाल्यानंतर मिळणाऱ्या तुटपुंज्या अनुदानातून या शाळांचे कामकाज चालते.
कोल्हापूर आर्य समाज एज्युकेशनल इन्स्टिट्युशन ही आर्य समाजामार्फत चालविली जाणारी एफ टू अशी नोंदणी मिळालेली शैक्षणिक संस्था. १८ मार्च १९१८ मध्ये कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आर्य समाजाला राजाश्रय दिला. बडोद्याहून पंडित आत्माराम यांना खास निमंत्रण देण्यात आले होते. या काळातच राजाराम कॉलेज, राजाराम हायस्कूल, तलाठी ट्रेनिंग स्कूल, वैदिक स्कूल, आदी शिक्षणसंस्था सुरू केल्या. राजाराम कॉलेजचे माजी प्राचार्य, इतिहासकार डॉ. बाळकृष्ण हे या संस्थांचे अध्यक्ष. त्यांच्यासमवेत एस. व्ही. टेंगशे, माखानसिंग, डॉ. नेपालसिंगजी, पंडित बाळकृष्ण शर्मा, डॉ. बोस, प्रा. देशपांडे, अॅड. दत्ताजीराव शेळके, डोणे, दादासाहेब हळदकर, शाहू महाराजांचे दंतवैद्य डॉ. काटे, मंत्री, डी. टी. मालक (अपराध) यांनीही काम केले. संस्थेमार्फत मंगळवार पेठेत शाहू दयानंद हायस्कूल, शाहू दयानंद मोफत मराठी शाळा, आर्य समाज बालमंदिर, कौलव येथे कै. बाळासाहेब कृ. पाटील-कौलवकर हायस्कूल, शां. कृ. पंत वालावलकर मोफत विद्यार्थी वसतिगृह, श्रद्धानंद आर्ट कल्चरल हॉल, शाहू दयानंद हायस्कूलचे तांत्रिक विभाग, शाहू दयानंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कसबा तारळे येथील बाळासाहेब पाटील कौलवकर-महाविद्यालय, क्रेयॉन्स इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल आणि स्पीड आॅन व्हील्स स्केटिंग ट्रेनिंग सेंटर अशा विविध शाखा कार्यरत आहेत. सेमी-इंग्लिश आणि सीबीएससी पॅटर्नचे प्ले ग्रुपपासून फर्स्टपर्यंतचे स्कूलही सुरू आहे.
संस्थेच्या सुवर्ण वाटचालीत शाहू दयानंद हायस्कूलचे मोठे योगदान आहे. मंगळवार पेठेतील या शाळेने जुना इतिहासकालीन बाज अजूनही जपला आहे. संस्थेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. ए. आर. भोसले मुख्याध्यापक असून २२ शिक्षक, तीन लिपिक, १३ सेवक, एक प्रयोगशाळा सहायक आणि ग्रंथपाल येथे काम करीत आहेत. आठवी ते दहावीच्या एका तुकडीसाठी तांत्रिक शिक्षणही दिले जाते. इलिमेंट्स आॅफ इलेक्ट्रिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, संगणक, अभियांत्रिकी, चित्रकला, आदी विषय येथे शिकविले जातात. व्यवसाय मार्गदर्शन शिक्षणही दिले जाते.
हायस्कूलमध्ये स्व. बाळासाहेब पाटील-कौलवकर स्मृतिदिन, शाहू जयंती, लोकमान्य टिळक जयंती, अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी, शिक्षकदिन, गुरुपौर्णिमा, हिंदी दिन, सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. विविध स्पर्धांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. हायस्कूलमध्ये अल्पबचत विभाग, आरएसपी विभाग, एनसीसी विभाग, विज्ञान मंडळ, स्काउट गाईडचेही शिक्षण दिले जाते; तसेच पालक मेळावेही आयोजित केले जातात. शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी मैदानी स्पर्धेत यश मिळविले. याशिवाय क्रिकेट, कबड्डी स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा, खो-खो, गोळाफेक, उंच उडी, लांब उडी, मल्लखांब, जलतरण अशा स्पर्धेतही विद्यार्थी चमकले आहेत.
विज्ञान विभागामार्फतही विविध विज्ञान प्रदर्शन स्पर्धा, प्रदूषणमुक्त व पर्यावरणमुक्त गाव, धान्य उफवणी यंत्र, पवनचक्कीवर विद्युतनिर्मिती अशी उपकरणे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केली. चित्रकला विभागामार्फतही अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. हायस्कूलमधील ग्रंथालय विभागही सुसज्ज असून ९००० पुस्तके येथे आहेत.
कुस्तीचा आखाडा
शाहू दयानंद हायस्कूलचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेला लाल मातीचा कुस्तीचा आखाडा. अनेक मल्ल याच तालमीत कुस्त्या शिकले. आजही हा आखाडा सुस्थितीत आहे. येथील शां. कृ. पंत वालावलकर विद्यार्थी वसतिगृह हे दक्षिण महाराष्ट्रातील नामवंत मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह आहे. पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी येथे आहेत. ६ जुलै १९६८ रोजी तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. कर्नल वूडहाउस वसतिगृह हे त्याचे पूर्वीचे नाव आहे. माजी खासदार के. एल. मोरे हे याच वसतिगृहाचे विद्यार्थी होते. अमोल पाटील हे वसतिगृहाचे अधीक्षक आहेत.
क्रीडांगणाचा वारसा
हायस्कूलला खेळाची एकूण तीन मैदाने आहेत. विस्तृत पटांगणावर क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खो-खो यांसारखे खेळ विद्यार्थी खेळतात. म्हादबा मेस्त्री यांचे बंधू दत्ताजीराव शेळके याच शाळेचे विद्यार्थी. त्यांचे नाव या शाळेच्या सांस्कृतिक सभागृहाला देण्यात आले आहे.
मान्यवरांच्या भेटी
संस्थेस माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, नारायण राणे, माजी मंत्री बाळासाहेब देसाई, हर्षवर्धन पाटील, राजेंद्र टोपे, बाबासाहेब कुपेकर, सतेज पाटील, आदींनी भेट दिली आहे.
आर्य समाजाची शिकवण
सत्यविद्येचे पवित्र शास्त्र वेद आहेत. वेद शिकणे, शिकविणे, ऐकणे, त्यांचा दुसऱ्यांना उपदेश करणे हा प्रत्येक आर्याचा परमधर्म आहे. सर्व कामे सत्यासत्यतेचा विचार करून केली पाहिजेत. वैदिक सनातन धर्मीयांचा जगाचे कल्याण करणे हा उद्देश आहे. अविद्येचा नाश आणि विद्येची वृद्धी केली पाहिजे. सर्वांच्या उन्नतीमध्येच आपली उन्नती समजावी, असे आर्य समाजाचे नियम या शाळांमधून पाळले जात. या शाळांमधून स्वामी दयानंद यांनी लिहिलेला ‘सत्यार्थप्रकाश’ हा ग्रंथ विद्यार्थ्यांना सक्तीचा विषय केला होता. कोल्हापूर-जोतिबा मार्गावरील केर्ले येथे गुरुकुलाची स्थापना केली होती.
बाळासाहेब पाटील- कौलवकरांचे कर्तृत्व
दि. १९ जून १९२३ रोजी जन्मलेले अॅड. बाळासाहेब पाटील-कौलवकर हे काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते होते. त्यांनी अनेक शासकीय पदे भूषविली. १९६२ पासून १२ जून १९९१ रोजी त्यांचे निधन होईपर्यंत जवळपास तीस वर्षे त्यांनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले. त्यानंतर त्यांचे सुपुत्र अॅड. दिलीपसिंह पाटील-कौलवकर यांच्याकडे आज या संस्थेची सूत्रे आहेत.
(संदर्भ : राजर्षी शाहू महाराज चरित्रग्रंथ : रमेश जाधव)