‘अग्निदिव्य’मधील ‘शाहू’ हरपले
By admin | Published: March 4, 2017 01:10 AM2017-03-04T01:10:08+5:302017-03-04T01:10:08+5:30
पुण्यात प्रयोग सुरू असताना सागर चौगुले यांचे हृदयविकाराने निधन
पुणे : रंगभूमीवर प्रयोग सुरु असतानाच ‘अग्निदिव्य’या नाटकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांंची मुख्य भूमिका साकारणाऱ्या सागर शांताराम चौगुले (वय ३८) या हरहुन्नरी कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू झाला.
पुणे येथील टिळक स्मारक रंगमंदिर येथे शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. सागर यांच्यासारख्या उमद्या कलाकाराच्या अशा अचानक जाण्याने कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
सागर हे चित्रपट निर्माते-दिग्दर्शक शांताराम चौगुले यांचे चिरंजीव व ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचे भाचे होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दीड वर्षाची मुलगी, आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
पुण्यातील टिळक स्मारक रंगमंदिरामध्ये शुक्रवारी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी सुरु होती. काळम्मावाडी (ता. राधानगरी) येथील हनुमान तरुण मंडळाच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांंच्या जीवनावर आधारित ‘अग्निदिव्य’हे नाटक अंतिम फेरीत होते. सुनील माने यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. कोल्हापूर संघाचा ४० कलाकारांसह ‘अग्निदिव्य’ या नाटकाचा प्रयोग सुरू होता. नाटकाच्या सुरुवातीपासून शाहू महाराजांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या सागर यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळविली होती. मात्र, नाटकाचे मध्यांतर होण्याआधीच नाटकातील आपले संवाद म्हणतानाच सागर यांना हृदयविकाराचा तीव झटका आला आणि तो रंगमंचावर कोसळला. सहकलाकारांनी तातडीने त्यांंना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कोणताही प्रतिसाद देत नसल्याने त्याला पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले ; परंतु तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
सागर हे मूळचे कोल्हापूरचे असून चित्रपट निर्माते शांताराम चौगुले यांचे चिरंजीव होत. त्यांचा कोल्हापूरमध्ये जाहिरात क्षेत्राशी निगडित व्यवसाय आहे. मात्र, अभिनयाच्या आवडीमुळे महाविद्यालयीन जीवनापासूनच ते नाटकांमध्ये भाग घेत असत. सहा महिन्यांपूर्र्वीच ‘अग्निदिव्य’ हे नाटक बसविण्यात आले होते. त्यामध्ये त्यांनी साकारलेल्या शाहू महाराजांच्या भूमिकेचे सर्वच स्तरांतून कौतुक होऊन त्यांना वाहवा मिळत होती. शुक्रवारीही पुण्यात नाटक सादर करताना त्यांनी सर्वच रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळविली होती. सागर यांनी नाटकाबरोबर काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. लवकरच त्यांचा ‘सासू आली, अडचण झाली’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. (प्रतिनिधी)
शाहू महाराजांची हुबेहूब भूमिकाराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची भूमिका सागर हा अत्यंत ताकदीने उभा करणारा कलावंत होता. नाटकातील मध्यवर्ती भूमिका त्याची होती. साक्षात शाहू महाराज आपल्यासमोर उभे आहेत, असे वाटे. तो बोलताना अंगावर शहारे यायचे... इतका जिवंतपणा त्याने भूमिकेत ओतला होता. शाहू महाराज जिवंत असते तर त्याचा अभिनय पाहून त्यांनी या कलावंताला गळ्यातील मोत्याचा हार काढून दिला असता.