महिलांसाठी स्वतंत्र ठिबक सिंचन योजना यशस्विपणे राबविणारा ‘शाहू’ देशातील पहिला साखर कारखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:30 AM2021-09-16T04:30:57+5:302021-09-16T04:30:57+5:30
सांगाव : शाहू साखर कारखान्याने महिलांसाठी स्वतंत्र विजयमाला घाटगे ठिबक सिंचन योजना यशस्विपणे राबविली आहे. त्यासाठी जादा अनुदानाची ...
सांगाव : शाहू साखर कारखान्याने महिलांसाठी स्वतंत्र विजयमाला घाटगे ठिबक सिंचन योजना यशस्विपणे राबविली आहे. त्यासाठी जादा अनुदानाची तरतूद केली आहे. अशाप्रकारे महिलांसाठी स्वतंत्र ठिबक सिंचन योजना यशस्विपणे राबविणारा शाहू कारखाना देशातील पहिला साखर कारखाना आहे, असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.
सांगाव (ता. कागल) येथे या योजनेचा लाभ घेऊन यशस्विपणे ठिबक सिंचन यंत्रणा कार्यान्वित केलेल्या दीपा सागर शहा यांच्या शेतीला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते.
म्हणाले, ऊस शेतीत ठिबक सिंचन काळाची गरज आहे. हे ओळखून कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी सभासदांसाठी ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान सुरू करून प्रोत्साहन दिले. शाहू साखर कारखान्याकडे ऊसपुरवठा करणाऱ्या सभासद बिगर सभासद महिला ऊस उत्पादकांसाठी वाढीव अनुदान देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांच्या पश्चात शाहू साखर कारखान्यांनी केले आहे. त्याचा लाभ महिला ऊस उत्पादक शेतकरी घेत आहेत. हे या योजनेचे फलित आहे. त्याचा मला अभिमान आहे.
या योजनेच्या लाभार्थी दीपा शहा म्हणाल्या, शाहू साखर कारखान्याच्या संचालिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या पुढाकारातून व कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी राबवलेल्या स्वतंत्र सिंचन योजनेचा लाभ घेऊन मी माझ्या शेतीमध्ये ठिबक सिंचन यंत्रणा यशस्विपणे कार्यान्वित करून अनुदान घेतले आहे. त्यामुळे एकरी ३० ते ४० टन असलेले उसाचे उत्पादन आता ६० ते ७० मेट्रिक टनांवर पोहोचले आहे. आता एकरी १०० टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ‘शाहू’च्या मार्गदर्शनामुळे हे साध्य होईल. या योजनेचा लाभ महिला शेतकऱ्यांसह इतर सभासदांनीही घ्यावा.
छायाचित्र- कसबा सांगाव येथे शाहू कारखान्याच्या विजयादेवी घाटगे महिला ठिबक सिंचन योजना यशस्विपणे कार्यान्वित केलेल्या दीपा शहा यांच्या ऊस क्षेत्राच्या पाहणीवेळी शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे.