शाहूंनी सुराज्याचे मॉडेल देशाला दिले
By admin | Published: June 27, 2015 12:54 AM2015-06-27T00:54:22+5:302015-06-27T00:54:46+5:30
समाजवादी नेते भाई वैद्य : राजर्षी शाहू पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न
समाजवादी नेते भाई वैद्य : राजर्षी शाहू पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न
कोल्हापूर : जातिभेद निर्मूलन, कृषिविकास, शिक्षण आणि उद्योग या सर्वच क्षेत्रांत राजर्षी शाहूंची दृष्टी अतिशय व्यापक होती. आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी या क्षेत्रात प्रयोग करत स्वराज्यातून सुराज्य कसे निर्माण करता येईल, हे दाखवून दिले. शाहूंचे हे वैचारिक मॉडेल देशामध्ये अमलात आणले तर सामाजिक क्रांती होईल, असे उद्गार ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी शुक्रवारी काढले. येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतफेर् तिसावा शाहू पुरस्कार ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते भाई वैद्य यांना देण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शाहू स्मारक भवनात झालेल्या या कार्यक्रमास शाहूप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी भाई वैद्य यांना राजर्षी शाहूंचा चरित्रग्रंथ देऊन स्वागत केले.
वैद्य म्हणाले, आरक्षण, विविध जातींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची निर्मिती, राधानगरी धरण हे दूरदृष्टीचे निर्णय शाहूंनी त्या काळात घेतले. सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करीत शैक्षणिक क्षेत्रातील विषमताही संपवण्याचे शाहूंचे कार्य शासनकर्त्यांना मार्गदर्शक आहे. एक शासक काय-काय करू शकतो, याचा आदर्श पाठच शाहूंनी करवीर संस्थानामध्ये घालून दिला.
वैद्य पुढे म्हणाले, शाहू महाराज जातनिर्मूलनासाठी आयुष्यभर लढले. जातिभेद निर्मूलनासाठी प्रत्यक्ष कृती केली. त्यांचे प्रत्येक पाऊल समाजाला पुढे नेणारेच होते. महापुरुषांचे पुतळे उभारून त्यांवर पृष्पवृष्टी करण्यापेक्षा त्यांचे विचार अमलात आणण्याची गरज आहे. प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, राजर्षी शाहूंनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे भारताला डॉ. आंबेडकरांच्या रूपाने घटनेचे शिल्पकार मिळाले. राजर्षी शाहूंनी राजविलासात दंग होण्याऐवजी सर्वसामान्यांत मिसळून त्यांची दु:खे जाणून घेतली. त्यांना अर्थार्जनाबरोबरच सन्मान दिला. जातिभेद निर्मूलनासाठी प्रयत्न करताना त्यांची कुचेष्टाही झाली; पण ते कुणापुढेही डगमगले नाहीत.
अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सक्तीचे प्राथमिक शिक्षण, रोजगार योजना, आरक्षण या क्षेत्रांत शाहूंचे कार्य मौलिक आहे. समतेचा विचार करताना आपण व्यवहारात जातिबंधने कमी करतो का, याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी प्रास्ताविक केले. मानपत्राचे वाचन ट्रस्टचे सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी केले. प्रशासनाधिकारी राजदीप सुर्वे यांनी आभार मानले.
अंत:करणातील सल..
सत्कारानंतर बोलण्यास उभे राहिल्यावर भाई वैद्य यांना पहिली आठवण ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची झाली. भाई म्हणाले, ‘आज येथे माझी नजर गोविंद पानसरे यांना शोधत आहे. कोल्हापुरात आलो आणि त्यांना भेटलो नाही असे कधीही झाले नाही. त्यांची आज येथे भासणारी उणीव ही माझ्या अंत:करणातील सल आहे व ती सल कधी निघेल हे मला सांगता येत नाही. शाहूंचे विचार तितक्याच पोटतिडकीने पुढे नेणारे ते कृतिशील विचारवंत होते.’