शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बँकेत ‘सत्तारूढ’चे वर्चस्व
By admin | Published: March 23, 2015 11:18 PM2015-03-23T23:18:55+5:302015-03-24T00:14:01+5:30
१५ पैकी १४ जागा जिंकल्या : रवींद्र पंदारे यांचा करिश्मा
कोल्हापूर : राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् को-आॅप. बॅँकेत पंचवार्षिक निवडणुकीत रवींद्र वसंतराव पंदारे यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू ’ सत्तारूढ पॅनेलने १५ पैकी १४ जागा जिंकत बॅँकेवरील वर्चस्व कायम राखले. एका जागेवर विरोधी ‘स्वाभिमानी’ पॅनेलचे प्रमुख बाळासाहेब घुणकीकर हे विजयी झाले. ‘सत्तारूढ’चे नेते रवींद्र पंदारे यांनी आपल्या नेतृत्वाचा करिश्मा कायम राखला. माजी अध्यक्ष विश्र्वासराव माने यांच्या पॅनेलला मतदारांनी धुळ चारली.
कोल्हापूरसह सात जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बॅँकेसाठी तिरंगी लढत झाली. पंदारे यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू सत्तारूढ’, बाळासाहेब घुणकीकर, राजन देसाई यांच्या नेतृत्वाखालील ‘स्वाभिमानी परिवर्तन’ व विश्वासराव माने यांच्या नेतृत्वाखालील ‘आदर्श पॅनेल’ यांच्यात लढत झाली. रविवारी १५ जागांसाठी ४६.९० टक्के मतदान झाले. तिन्ही पॅनेलने निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने निवडणुकीत शेवटपर्यंत चुरस राहिली; पण जास्तीत जास्त मतदारांना बाहेर काढण्यात सर्वच उमेदवार अपयशी ठरले. सोमवारी रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी झाली. दहा जागी सुरुवातीपासून सत्तारूढने वर्चस्व राखले.
भटक्या विमुक्त गटातील ‘स्वाभिमानी’चे नेते बाळासाहेब घुणकीकर वगळता राखीव गटात ‘सत्तारूढ’चे उमेदवार आघाडीवर होते. घुणकीकर यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी महादेव लांडगे यांचा १६८ मतांनी पराभव केला. (प्रतिनिधी)
सत्तारूढ पॅनेल, कंसात मते
सर्वसाधारण गट- शशिकांत तिवले (४६६९), रवींद्र पंदारे (४५२७), रमेश घाटगे (४०५६), भरत पाटील (४००४), मधुकर पाटील (३९६५), प्रकाश पाटील (३९२३), राजेंद्र चव्हाण उर्फ बन्नाशेठ (३८७२), अतुल जाधव (३८६५), विलासराव कुरणे (३७४४), राजेंद्र पाटील (३६५५). महिला राखीव- हेमा पाटील (४०१७), नेहा कापरे (३७२५). इतर मागासवर्गीय - संजय सुतार (३५३८). अनुसूचित जाती/जमाती- जयदीप कांबळे (३९५५).
‘स्वाभिमानी’ पॅनेल : भटक्या जाती/ विमुक्त जमाती - बाळासाहेब घुणकीकर (४०४४)
संस्थेचे कार्यक्षेत्र : कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग .
पाच वर्षांत सभासदांसाठी केलेल्या कामाची पोहोचपावती मिळाली. सभासदांना दिलेला वचननाम्यानुसार काम करू.
- रवींद्र पंदारे, राजर्षी शाहू सत्तारूढ पॅनेल प्रमुख.