जागतिक स्तरावर खाते उघडणारा शाहू तिसरा कोल्हापूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 04:03 PM2018-10-08T16:03:56+5:302018-10-08T16:05:46+5:30
नेमबाजीची खाण म्हणूनही आता कोल्हापूरच नाव जगाच्या नकाशावर येवू लागले आहे. त्याच परंपरेत आता नव्याने शाहू तुषार माने या सतरा वर्षीय आंतरराष्ट्रीय नेमबाजाचीही भर पडली आहे.
सचिन भोसले
कोल्हापूर : करवीरनगरी जशी कलानगरी म्हणून जगप्रसिद्ध आहे, तशीच क्रीडानगरी म्हणूनही सातासमुद्रापार प्रसिद्ध होऊ लागली आहे. या परंपरेनुसारच नेमबाजीची खाण म्हणूनही आता कोल्हापूरच नाव जगाच्या नकाशावर येवू लागले आहे. त्याच परंपरेत आता नव्याने शाहू तुषार माने या सतरा वर्षीय आंतरराष्ट्रीय नेमबाजाचीही भर पडली आहे.
अर्जेंटिना (ब्युईनस एअरज) येथे सुरू असलेल्या युवा आॅलिंम्पिक मध्ये भारताला प्रथमच रौप्य पदक मिळवून दिले. यापुर्वी कोणत्याही भारतीयाने अशी कामगिरी केल्याची नोंद नाही. त्यामुळे अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय नेमबाज ठरला आहे.
शाहूचा जन्म मुळात फुटबॉलच खऱ्या अर्थाने माहेर घर म्हणवणाऱ्या शिवाजी पेठेतील सरदार तालीम परिसरातल. या पेठेत फुटबॉलचे अनेक मोहरे जन्मले. त्यांनी कोल्हापूरच्या शाहू स्टेडीयम पासून देशातील अनेक मैदानही गाजविली.
त्यामुळे या परिसरांतून अनेक दिग्गज फुटबॉलपटू या पेठेने दिले आहेत. ही परंपरा असतानाही घरातल्यांनी फुटबॉल सोडून अन्य खेळात तू जा, असा सल्ला दिला. शाहूला मुळात फुटबॉलची आवड असतानाही नाइलाजास्तव प्रथम शिवाजी स्टेडियम येथील क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंसोबत धावण्याच्या सराव करीत होता.
यात उन्हाळी सुटीत तेथील काही मुलांनी दुधाळी येथील शूटिंग रेंजवर नेमबाज रोहित हवालदार व आंतरराष्ट्रीय नेमबाज राधिका हवालदार यांनी आयोजित केलेल्या शिबिरामध्ये एक मजा म्हणून सहभाग घेतला.
२०१५ सालची ही गोष्ट. त्यात त्याने पहिल्याच प्रयत्नात ७५ इतके चांगले गुण प्राप्त केले. ही बाब प्रशिक्षकांसह आई आशा व वडील तुषार माने यांच्या लक्षात आली. त्यातून तो मनापासून नेमबाजीमध्ये रस घेवू लागला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहीले नाही.
शालेय, जिल्हा, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरांवर चमक दाखविली. यातून त्याची निवड जपान येथे झालेल्या आशियाई नेमबाजी स्पधेर्साठी झाली. त्यात त्याने १० मीटर एअर रायफल सुवर्णमयी कामगिरी केली. प्रकारात कास्य पदकाची कमाई केली. त्यानंतर मार्च २०१८ मध्ये सिडनी (आॅस्ट्रेलिया) येथे झालेल्या ज्युनिअर जागतिक स्पर्धेतही त्याने उत्कृष्ट कामगिरी केली.
खरे लक्ष तर त्याचे अर्जेटिंना येथील युथ आॅलिम्पिक वर लागून राहीले होते. या स्पर्धेसाठी पात्र ठरताना शाहूने सिडनी येथील स्पर्धेत पात्रता फेरीत कास्य पदकाची कमाई केली. यासह त्याला कोटापद्धतीतून एक संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. आणि त्याने रविवारी या स्पर्धेतील भारताचे पहिले रौप्य पदक मिळवून आतापर्यंतच्या इतिहासात पहिले खाते खोलण्याचा मानही मिळवला.
लक्ष्याचा अचूक भेद घेण्याची क्षमता असलेला शाहू त्रिवेंद्रम येथे नियमित सराव करतो, तर कोल्हापुरात असल्यानंतर तो रोहित हवालदार यांच्या खासगी नेमबाजी शूटिंग रेंजवर सराव करतो. दिल्लीत असल्यानंतर तो तुघलताबाद येथील शासकीय शूटिंग रेंजवर आंतरराष्ट्रीय नेमबाज व प्रशिक्षक, सुमा शिरुर, दीपाली देशपांडे, दीपक दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याच्या वडिलांचा औषधविक्रीचा व्यवसाय आहे, तर आई गृहिणी आहे.
शिवाजी पेठेत घराघरांमध्ये फुटबॉलचे वेड आहे. मात्र, घरच्यांनी फुटबॉल सोडून दुसरा कोणताही खेळ खेळत जा, असा दरडावून सल्ला दिला. त्यामुळे शाहूने नाइलाजाने फुटबॉलची आवड असूनही त्याचा त्याग केला. शिवाजी स्टेडियमवरील क्रीडा प्रबोधिनीच्या मुलांबरोबर धावण्याचा सराव कर असे वडीलांनी सुचविले. हा सराव करता करात उन्हाळ्याच्या सुटीत मी दुधाळी रेंजवर मजा म्हणून शूटिंग हा खेळ अंगिकारला. पहिल्या प्रशिक्षणातच अचूक लक्ष्य भेदले आणि माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली.
तिसरा कोल्हापूरकर
विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत तेजस्विनी सावंत हिने १० मीटर एअर रायफल प्रकारात विजेतेपद पटकाविले अशी कामगिरी करणारी ती पहिली महीला भारतीय ठरली. त्यानंतर राही सरनोबत हिने २२ आॅगस्ट २०१८ ला एशियाड मध्ये १० मीटर पिस्तल प्रकारात सुवर्ण पदक पटकावित अशी कामगिरी करणारी तीही पहिली भारतीय महीला ठरली.
रविवारी (दि.७) रोजी अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या युवा आॅलिंम्पिकमध्ये भारताला या स्पर्धेत पहिले रौप्य पदक अर्थात पदक मि ळवून देणारा तो पहिला भारतीय नेमबाज ठरला. या तिघात एकच साम्य म्हणजे हे तिघेही कोल्हापूरच्या मातीतील नेमबाज आहेत. हे विशेषच म्हणावे लागले नव्हे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुराच म्हणावा लागेल.
शेवटचे दोन शॉटस् चुकले त्यामुळे मी रशियाच्या ग्रिगोरिल शामकोव्ह यांच्यापेक्षा १.७ पॉईटने मागे पडलो आणि माझ सुवर्ण पदक हुकले. ही कसर मी गुरुवारी होणाऱ्या मिश्र दुहेरीत भरुन काढीन.
- शाहू माने,
आंतरराष्ट्रीय नेमबाज