संविधानापूर्वीच त्याची मुल्ये शाहूंनी संस्थानात रुजवली :लक्ष्मीकांत देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 06:01 PM2021-03-06T18:01:48+5:302021-03-06T18:04:42+5:30
literature Laxmikant Deshmukh kolhapur -संविधानाची संस्थानात रुजवात करणारे ते एकमेव पूर्वसुरी होते असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांनी संविधान अस्तित्वात येण्यापूर्वीच संविधानाच्या प्रास्ताविकेमधील स्वातंत्र्य, समता, बंधुता, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांची असोशीने अंमलबजावणी केली. शिक्षणाचा हक्क, आंतरजातीय विवाह, सक्तीचे मोफत शिक्षण, वेदोक्त प्रकरणानंतरची पुरोगामी चळवळ, त्यादृष्टीने संस्थानात लागू केलेले कायदे यातून संविधानिक मुल्ये रुजवली व त्या दिशेने कृतीशील पावले उचलली. संविधानाची संस्थानात रुजवात करणारे ते एकमेव पूर्वसुरी होते असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्रातर्फे ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार संपादित राजर्षी शाहू छत्रपती आणि कोल्हापूर (खंड-१२) आणि शाहू छत्रपती: राजा आणि क्रांतीकारक (खंड-१३) या दोन पुस्तकांचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. शिवाजी विद्यापीठाच्या छत्रपती शाहू स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत मद्रास विद्यापीठाचे डॉ. चंद्रा मुदलियार आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.एन. वैद्य यांनी दिलेल्या व्याख्यानांचा प्रा. दिलीप पंगू आणि चंद्रकांत गायकवाड यांनी अनुवाद केला.
डॉ. देशमुख म्हणाले, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी वि. रा. शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांनी महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला पुरोगामित्वाची दिशा दाखविली. त्यांना केवळ राज्यापुरते संकुचित करून चालणार नाही. जिथे जिथे वंचित, शोषितांची चळवळ सुरू आहे, तिथे तिथे या महापुरूषांचे अस्तित्व आहे. वर्तमानात महापुरुषांचे दैवतीकरण आणि विकृतीकरण सुरू आहे. दोन्ही बाबी प्रत्येकजण आपापल्या अजेंड्यानुसार करत असून हे गैर आहे.
डॉ. जयसिंगराव पवार प्रास्ताविकात म्हणाले, शाहू महाराजांनी शैक्षणिक व सामाजिक सुधारणांची चळवळ सुुरु केली तेंव्हा ब्राह्मणांना आपल्या प्रतिष्ठेला बाधा आल्यासारखे वाटले. वेदोक्त प्रकरणामुळे या भावनेला टोकाचे स्वरुप येऊन ब्राह्मणेतर चळवळ अधिक गतिमान झाली. ्अशा अनेक घटना आहेत की त्याचे खूप संशोधन होवू शकते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, उत्तम प्रशासन चालवायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या चरित्रांचा आजच्या तरुणांनी अभ्यास केला पाहिजे. शाहूंचे चरित्र प्रकाशात आणण्यासाठी केंद्रातर्फे प्रयत्न केले जातील. त्यांनी स्त्रियांसाठी केलेल्या कार्याविषयी केंद्रामार्फत लवकरच प्रकल्प हाती घेण्यात येईल. डॉ. देविकाराणी पाटील यांनी सूत्रसंचालन केले, सचिन घोरपडे यांनी संयोजन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले.