शाहू जिंकलास;शब्द खरा केलास; युवा आॅलिम्पिकमध्ये रौप्य, कोल्हापुरात जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:59 AM2018-10-08T00:59:09+5:302018-10-08T00:59:14+5:30
कोल्हापूर : ‘मी निश्चित चांगली कामगिरी करेन आणि युथ आॅलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक घेईन’ असा शब्द कोल्हापूरच्या युवा नेमबाज शाहू माने
याने शनिवारी रात्री आपली आई आशा
माने यांना दिला होता. रविवारी
झालेल्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक पटकावले तेव्हा शाहू जिंकलास, शब्द खरा केलास अशाचा प्रतिक्रिया उमटल्या.
त्याच्या यशानंतर शिवाजी पेठेतील सरदार तालीम परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या युथ आॅलिम्पिकमध्ये शाहूने देशासाठी पहिले पदक पटकावले. भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी ५.३० ला शाहूची स्पर्धा होती. सकाळपासूनच त्याची आई आशा व वडील तुषार चिंतेत होते. युथ आॅलिम्पिकमध्ये त्याला भारतातर्फे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली
आहे. याचे चीज झाले पाहिजे असे त्यांना वाटत होते. सकाळपासून सर्वजण त्याच्या स्पर्धेची वाट पहात होते. त्याच्या या कामगिरीची रविवारी रात्री शिवाजी पेठेत माहिती मिळताच, सरदार तालीम मंडळाच्या दारात फटाक्यांची आतषबाजी व हलगीच्या कडकडाटात जल्लोष करण्यात आला. वडील तुषार माने यांनी परिसरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. गुरुवारी (दि. ११) त्याचा याच प्रकारात मिश्र दुहेरीत सांघिक सामना आहे. त्याच्या या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.