प्रासंगिक: राजर्षी छत्रपती शाहू महाराज माफी असावी!, कोल्हापूरच्या मारेकऱ्यांपुढे आम्ही हतबल आहोत
By वसंत भोसले | Published: June 26, 2024 12:10 PM2024-06-26T12:10:11+5:302024-06-26T12:10:33+5:30
महाराज आम्हाला माफ करा आणि नेत्यांना कोल्हापूरचे कल्याण करण्याची सुबुद्धी सुचवा!
डाॅ. वसंत भोसले, संपादक, कोल्हापूर
राजर्षी छत्रपती शाहू महाराज आज तुमची जयंती. जिल्हाभर तुमचे स्मरण, अभिवादन करत कार्यक्रम होत आहेत. याचे कारण शंभर वर्षांपूर्वी जागतिकीकरणाचा शब्ददेखील कोणी उच्चारत नव्हते, त्याकाळी कोल्हापूर संस्थानाच्या परिसरास जगाबरोबर चालण्याची वाट तुम्ही दाखवली. जगात जे नवे, आधुनिक आणि मानवी कल्याणासाठी आवश्यक असेल, ते कोल्हापुरात आणले. त्यात कोल्हापूरने स्वातंत्र्यानंतर मोठी झेप घ्यावी, यासाठी तुमचा आदर्श समोर ठेवून एका पिढीने कष्ट उपसले.
पहिली पिढी गेली. जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले, तसे आम्ही हतबल होऊ लागलो. आज तर पुरते हतबल झालो आहोत, कारण जग पुढे गेले आणि कोल्हापूर तेथेच राहिले. आम्ही ज्यांना नेते मानले, त्या साऱ्यांनी कोल्हापूरला मारण्याचेच काम केले. ते दररोज शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणत होते, तेव्हा आम्हालाही आशा वाटत होती. ते तुमच्याच मार्गाने घेऊन जातील, मात्र कशाचे काय? त्यांच्या कटकारस्थानांनी अलीकडच्या काळात कोल्हापूर मागे पडत राहिले आणि आम्ही हतबल होत गेलो.
सर्वांना शिक्षण तेदेखील मोफत मिळो, वंचितांना आरक्षण, तेही हक्काने मिळो, मुलांची शिकण्याची अडचण दूर होवो, म्हणून वसतीगृहांची चळवळ, शेती सुधारावी म्हणून नवं बियाणं, चांगलं पशुधन, शेतमालाला भाव, व्यापारासाठी बाजारपेठ आणि मुंबईकरांचीच व्यापार-उद्योगात मक्तेदारी का म्हणून आव्हान देत कापड गिरणीची उभारणी ! पाण्याच्या टंचाईने शेती संकटात नको, म्हणून धरणाच्या बांधणीसाठी धडपड. रस्ते बांधले, रेल्वे आणली कोणतंही क्षेत्र सोडलं नाही. सर्वव्यापी जीवन आमचे समृद्ध करण्यासाठी तुम्ही धडपडलात !
आपल्या जनतेच्या कल्याणासाठी जे-जे हवे ते कोल्हापुरात उभारलं, किंबहुना जगाचं ज्ञान येथे आणलं. याच वाटेनं पुढं जायचं, म्हणून आम्ही तुमचं दररोज नाव घेणाऱ्यांच्या मागे उभे राहिलो.
कोल्हापूरची शान तुम्ही वाढविली, त्यांनी हद्द वाढविली नाही, आम्ही हताश झालो नाही. पंचगंगा तुम्ही बारमाही केली, आम्ही ती प्रदूषित होताना पाहिली. त्याच नदीत डुबकी मारताना तुम्ही धार्मिक भेदाभेदाला सामोरे गेलात अन् आव्हान देऊन आमच्यासाठी लढलात. तुम्हाला शुद्र म्हणून हिणवलं, तरी जिद्द सोडली नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना पाठबळ दिलं. शिकून मोठा होताच, देशातील उपेक्षित, वंचित, दीनदुबळ्यांचा नेता म्हणून त्यांची नेतेपदी निवड केलीत. आमचे नेते जिल्हा परिषदेचे सदस्यत्वही घराबाहेर कोणाला देईना झालेत.
तुम्ही, संस्थानची तिजोरी जनतेसाठी वापरली. साधे राहिलात. मौजमजा कधी केली नाही. तुमचे मारेकरी मात्र रोज पैशांनी आपली घरे भरताहेत, मौजमजा करताहेत. सत्तेसाठी पैसा आणि पैशांसाठी सत्ता वापरत आहेत. शेतकऱ्यांच्या संस्था आमच्या डोळ्यादेखत लुटत आहेत. त्यांच्यावर कर्जाचे डोंगर उभे करीत आहेत, आम्ही हतबल आहोत. आपली मुले परदेशात पाठवित आहेत, तुमची वसतीगृह अडगळीत पडत आहेत.
आमच्या नेत्यांमुळे नद्या बाद झाल्या, शहरे खुजे झाले, डोंगर बोडके झाले. जमिनी लाटल्या गेल्या. रेड झोनमधील जमिनीवर इमले उभारून त्याचा बाजार मांडला गेला. हद्दवाढीचा घोळ स्वत:च्या राजकारणासाठी घालून आम्हालाच वेड्यात काढतात. आमच्यामध्ये भांडणे लावतात. कोल्हापूरचे शिक्षण अ ब क ड पासून तुम्ही सुरू केलं. बदलते तंत्रज्ञानही ते आम्हाला शिकवत नाहीत. तेच जुने अभ्यासक्रम, नोकरीसाठी जगाच्या पाठीवर धावायचं, नदी प्रदूषणात मळी टाकणारे हेच, रेल्वे तुम्ही आणलीत ती अजूनही तेथेच थांबली आहे. तिचा डेड एंड संपतच नाही. नवे स्थानक उभं राहत नाही. शहरातील रस्ते असे केलेत की, तुमच्या कोल्हापूरचे नाव खड्डेपूर म्हणून लोक आम्हाला हिणवू लागलेत.
महाराज, यांना तुमचे जन्मस्थळ नीट आणि लवकर बांधता आले नाही. सूतगिरणी चालिवता आली नाही. धरणांची गळती काढता आली नाही. कोल्हापूरला जोडणारे रस्ते चांगले करता आले नाहीत. रंकाळ्याचे संवर्धन करा, म्हणून भांडावे लागतं. तुमचा इतिहास सांगण्यासाठी, दाखविण्यासाठी तो एकत्र बांधून ठेवा, चांगलं कलादालन बांधावे, असे काही त्यांना वाटत नाही. तुम्ही कलेला राजाश्रय दिलात, त्या शहराचे कला महाविद्यालय खड्ड्यात चालतं.
किती गोष्टी सांगाव्यात ? हे कोणत्याही पक्षात जातात. नाव मात्र नेहमी तुमचं घेतात. सतत आमचे (जनतेचे) कल्याण करणार असे सांगतात. दररोज एकमेकांवर आगपाखड करतात, रोज बातम्यांचे रतीब घालतात. त्या छापा नाही तर जाहिराती बंद करतो, अशा धमक्या देतात. आम्हीही त्यांची सावली सोडत नाही. आम्हाला तुमचे नाव सांगून मिंधे केले आहे.
शाहूंचा विचार हा केवळ परवलीचा शब्द झाला आहे. प्रत्यक्षात विकास कामाच्या नावाखाली तोडपाणी चालू आहे. प्रत्येक कामात समाजाचे नव्हे, तर माझे कसे भले होईल, याचाच विचार करून सदैव राजकारण करणारी जमात आमच्या वाट्याला कशी आली ? अखंड भारतातील पहिले कुस्ती स्टेडियम तुम्ही उभारलं, त्या स्टेडियमची माती पैलवानांच्या अंगाला लागण्यासाठी नियमितपणे चार-दोन मैदाने भरविता येऊ नयेत? तुमच्या पावलावर पाऊल टाकत सारे जग बघून येतात, मात्र जगातलं काही कोल्हापुरात आणत नाहीत. महाराज, माफ करा आम्हीच कोठे तरी यांना वळण लावण्यात कमी पडलो. त्यामुळे ‘तुमच्या नावाचा जयजयकार आणि विचार, कार्य यांचा विसर’, अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराज आम्हाला माफ करा आणि नेत्यांना कोल्हापूरचे कल्याण करण्याची सुबुद्धी सुचवा!