Shahu Maharaj Jayanti शाहू मिलवरील प्रकल्पाबाबत २0 जुलेनंतर बैठक : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 11:18 AM2018-06-26T11:18:31+5:302018-06-26T11:20:30+5:30
राजर्षि शाहू मिलच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाबाबत पावसाळी अधिवेशन झाले की २0 जुलैनंतर बैठक घेणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंगळवारी सकाळी शाहू जन्मस्थळी अभिवादन केल्यानंतर उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
कोल्हापूर : राजर्षि शाहू मिलच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाबाबत पावसाळी अधिवेशन झाले की २0 जुलैनंतर बैठक घेणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंगळवारी सकाळी शाहू जन्मस्थळी अभिवादन केल्यानंतर उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
राजर्षि शाहू महाराजांच्या जयंतीच्यानिमीत्ताने मंत्री पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी यावेळी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, महापौर शोभा बोंद्रे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. जयसिंगराव पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री म्हणाले, शाहू जन्मस्थळी उत्तम संग्रहालय व्हावे यासाठी १३ कोटी रूपये मंजूर आहेत. त्यातील २ कोटी रूपये खात्यावर जमाही आहेत. मात्र हे काम करणाऱ्यांची संख्या कमी आहे. तीन वेळा निविदा काढल्याशिवाय दुसऱ्या पध्दतीने हे काम करता येणे नियमानुसार शक्य नाही. त्यामुळे तीन वेळा निविदा काढल्या. यानंतर अन्य ठेकेदारांकडून निविदा मागणवण्यासाठी परवानगी घेतली. ५ निविदांपैकी २ नाकारण्यात आल्या असून ३ मंजुरीसाठी मुंबईला पाठवण्यात आल्या आहेत. ती मंजुरी आली की कामाला सुरूवात होईल.
शाहू महाराजांच्या विचाराला धरून सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावा घेताना पाटील म्हणाले, मराठा समाजातील मुलामुलींच्या सर्वांगिण उन्नतीसाठी ‘बार्टी’च्या धर्तीवर संस्था स्थापन करावी अशी मराठा मोर्चाची मागणी होती. ती ‘सारथी’च्या रूपाने पूर्ण होत आहे.
यातून या मुलामुलींना परदेशी जाण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यापासून ते समाजाच्या आर्थिक, सांस्कृतिक स्थितीचाही अभ्यास होणार आहे. महाराजांच्या नावे शिष्यवृत्तीही सुरू असून त्यातील ५0 टक्के रक्कम शासन भरणार आहे. शाहू समाधीस्थळालाही गती देण्याची त्यांनी सुचना केली.
शाहू मिलच्या जागी केवळ स्मारक होण्यापेक्षा ज्या हेतूने मिलची स्थापना झाली होती तोच हेतू ठेवून महिला गारमेंट पार्क उभारण्याचे नियोजन असून दिल्लीतून वस्त्रोद्योग विभागाकडील प्रस्तावाची स्थिती आपण पाहू आणि या कामाला देखील गती देवू अशी ग्वाही दिली.
यावेळी उपमहापौर महेश सावंत, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख संजय मोहिते उपस्थित होते.