शाहू महाराज जयंती विशेष : स्वप्निल पाटीलच्या दहाहून अधिक तैलचित्रांना राज्यात मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 08:42 PM2021-06-26T20:42:51+5:302021-06-26T20:56:05+5:30
Shahu Maharaj Jayanti kolhapur : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी अनेक कलावंतांना प्रोत्साहन म्हणून राजाश्रय दिला. त्या शाहू महाराजांचे गारुड आजही अनेक ज्येष्ठ तसेच युवा चित्रकारांवर कायम आहे. शाहूंची विविध शैलीतील चित्रे काढून आजही हे कलावंत नाव कमावत आहेत. कोल्हापूरचा युवा चित्रकार स्वप्निल पाटील यानेही आतापर्यंत शाहू महाराजांची दहाहून अधिक तैलचित्रे काढली असून राज्यभरातून त्याच्या चित्रांना मागणी आहे. शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त या युवा चित्रकाराने आपल्या चित्रांच्या माध्यमातून या लोकराजाला अभिवादन केले आहे.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी अनेक कलावंतांना प्रोत्साहन म्हणून राजाश्रय दिला. त्या शाहू महाराजांचे गारुड आजही अनेक ज्येष्ठ तसेच युवा चित्रकारांवर कायम आहे. शाहूंची विविध शैलीतील चित्रे काढून आजही हे कलावंत नाव कमावत आहेत. कोल्हापूरचा युवा चित्रकार स्वप्निल पाटील यानेही आतापर्यंत शाहू महाराजांची दहाहून अधिक तैलचित्रे काढली असून राज्यभरातून त्याच्या चित्रांना मागणी आहे. शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त या युवा चित्रकाराने आपल्या चित्रांच्या माध्यमातून या लोकराजाला अभिवादन केले आहे.
कोल्हापूर येथील युवा चित्रकार स्वप्निल पाटील हा गेली १२ ते १३ वर्षे चित्रकार म्हणून कार्यरत आहे. गेल्या चार ते पाच वर्षांत त्याने छत्रपती शाहू महाराज यांची अनेक तैलचित्रे साकारली. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या राजर्षी शाहू पंचखंडात्मक स्मारक ग्रंथाच्या मुखपृष्ठावर एक तर त्यांच्या घरी लावण्यासाठी दुसऱ्या चित्रांचा समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, अकोट यांच्यासाठी छत्रपती शाहू महाराजांचे पाच फूट उंचीचे व्यक्तिचित्र बनवण्याचा मान मिळाला तर अलीकडे शाहू महाराजांचे जनक घराण्यातील समरजितसिंहराजे घाटगे यांच्यासाठी काही चित्रे काढण्याची संधी मिळाली. यातील दोन चित्रे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे तर एक छत्रपती शाहू महाराजांचे व्यक्तिचित्र आहे.
राज्याभिषेकाचे एक तैलचित्र कागल येथील श्री छत्रपती शाहू साखर कारखाना येथे लावले गेले आहे. चित्रकला ते स्टोरीबोर्डसाठी प्रसिद्ध मूळचा करवीर तालुक्यातील कसबा आरळे येथील स्वप्निल पाटील याने कला क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. त्याने ह्यलोकमतह्ण आयोजित श्लोक प्रदर्शनासह अन्य विविध ठिकाणी पुरस्कार मिळविलेले आहेत. तर जहांगीर आर्ट गॅलरीसह अनेक प्रतिथयश चित्रप्रदर्शनात त्याच्या चित्रांचा समावेश झाला आहे. याशिवाय गाजलेल्या हिरकणीसह अनेक मराठी चित्रपटांच्या स्टोरीबोर्ड स्वप्निलने तयार केले असून आगामी काही चित्रपटांच्या आणि मालिकांच्या स्टोरीबोर्डवर त्याचे काम सुरू आहे.
छत्रपती शाहू महाराज यांच्या चित्राची सुरुवात मी इयत्ता पाचवीत असताना केली. यामधील एका जलरंगातील चित्रास माझ्या आयुष्यातील पहिले शालेय पारितोषिक मिळाले. त्यानंतर मी शाळेच्या भिंतीवर महाराजांची चित्र रंगवली. त्यानंतर गेल्या पंधरा वर्षांत मी छत्रपती शाहू महाराजांची अनेक तैलचित्रे बनवली आहेत, ज्याला अजूनही चांगली मागणी आहे.
स्वप्निल पाटील,
चित्रकार, कोल्हापूर
नव्या पिढीही जपतेय जुन्या कलाकारांचा वारसा
छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूरमधील अनेक कला क्षेत्रातील कलावंतांना त्यांनी प्रोत्साहन दिले. यामुळे कोल्हापूरची ओळख कलापूर म्हणून देशातच नव्हे तर विदेशातही पोहोचली. जुन्या पिढीप्रमाणेच नव्या पिढीतील अनेक कलावंतही शाहूमहाराजांच्याच शिदोरीवर आजही चरितार्थ चालवताहेत, हे विशेष.