शाहू महाराज, कर्मवारी अण्णा ही तर प्रा. एन. डी. पाटील यांची वैचारीक दैवतच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 05:28 PM2022-01-17T17:28:22+5:302022-01-17T18:22:14+5:30
कोल्हापूर : प्रा. एन. डी. पाटील हे आयुष्यभर एकाच विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. जेव्हा राजकारण कळायला लागले तेव्हा शेका पक्षाचा ...
कोल्हापूर : प्रा. एन. डी. पाटील हे आयुष्यभर एकाच विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. जेव्हा राजकारण कळायला लागले तेव्हा शेका पक्षाचा लाल झेंडा त्यांनी खांद्यावर घेतला त्याला अखेरचा श्वास घेईपर्यंत कधीच अंतर दिले नाही. उभी हयात एका पक्षात राहण्याचे तसे एन.डी.सर हे देशाच्या राजकारणातील फारच दुर्मिळ उदाहरण असावे. पाच वर्षांत दोन पक्ष बदलण्याच्या काळात त्यांची वैचारिक व पक्षीय निष्ठा अधिकच झळाळून दिसत असे.
शाहू महाराज, कर्मवारी अण्णा ही तर प्रा. पाटील यांची वैचारीक दैवतेच. त्यांच्याच विचारांच्या आधारे ते सारे जीवन जगले. त्यामुळे त्यांच्या दिवाणखान्यात शाहू महाराज व कर्मवीर अण्णांचा पुतळा ठेवलेला असे. अलीकडील काही वर्षांत त्या पुतळ्याशेजारी त्यांचे शेका पक्षाचे निवडणूक चिन्हे असलेली बैलगाडीही दिमाखात उभी असे.
गोरगरीब कष्टकऱ्यांच्या श्रमाचेच ते प्रतीक. सातारा जिल्ह्यातील कृष्णा सहकारी साखर कारखान्यांवर सत्कार झाला तेव्हा त्यांना सभासदांनी ही बैलगाडी भेट दिली होती. औंध येथील कुंभार बांधवाने ही बैलगाडी अत्यंत सुबक व बारकाव्यासह बनवली होती. सोमवारी प्रा. पाटील शाहू महाराज, कर्मवीर अण्णांच्या वाटेने निघून गेले. विचारांच्या व बैलगाडीच्या रुपाने निष्ठेच्या आठवणी मागे ठेवून...
प्रा. पाटील हे कोल्हापुरातील रुईकर कॉलनीतील निवासस्थानी गेली वीस-बावीस वर्षे राहत होते. सक्रिय राजकारणातून बाजूला झाल्यावर प्रा. पाटील हे सुरुवातीला काही वर्षे मुंबईला खार परिसरात राहत होते. परंतु लोकांसाठी संघर्ष करत राहणे हे सरांचे टॉनिक. त्यामुळे मुंबईत राहून पश्चिम महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला त्यांच्याशी संपर्क साधणे, भेटणे अडचणीचे होईल म्हणून त्यांनी कोल्हापुरात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. त्यामुळे कोल्हापुरातील त्यांचे निवासस्थान कायमच गोरगरीब लोकांचे न्याय मागायला जाण्याचे हक्काचे ठिकाण होते. त्यांचा दरवाजा कायमच उघडा होता.
व्यक्तिगत अन्याय, सामाजिक प्रश्न घेऊन लोक त्यांच्याकडे यायचे. प्रत्येक प्रश्नांचा अभ्यास करून मगच प्रा. पाटील हे त्या प्रश्नांत उतरायचे. त्यामुळे एखाद्या प्रश्नावर ते कोणत्याही सरकारी कार्यालयात गेल्यावर तेथील अधिकाऱ्याच्या छातीत धडधड व्हायची. थातुरमातुर उत्तर दिलेले त्यांना आवडत नसे. त्या अधिकाऱ्याच्या मर्यादा किती आहेत हे पण लक्षात घेऊन घाव मंत्रालयात घालायला पाहिजे की कुठे हे ताडायचे. अलीकडील काही वर्षांत त्यांच्या बंगल्यातील बाहेरील खोली हे लोकांच्या भेटीचे केंद्र बनले होते. आज, सोमवारी मात्र ही खोलीसुद्धा रितेपण अनुभवत उदासपण अनुभवत होती.