मुंबईतील खेतवाडीत शाहू महाराजांचा ‘स्मृतिस्तंभ’ उभारावा, राजर्षी शाहू सलोखा मंचच्या बैठकीत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 12:37 PM2022-01-29T12:37:58+5:302022-01-29T12:54:58+5:30
कोल्हापूर ते खेतवाडी पर्यंत निघणार ‘शाहू विचार यात्रा’
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांचे निधन झालेल्या मुंबईतील खेतवाडी येथे राज्य शासनाच्यावतीने स्मृतिस्तंभ उभारावा, असा ठराव राजर्षी शाहू सलोखा मंचच्या बैठकीत करण्यात आला. त्याचबरोबर ६ मे २०२२ रोजी कोल्हापूर ते खेतवाडी ‘शाहू विचार यात्रा’ काढण्याचा निर्णयही घेण्यात आला.
राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त राजर्षी शाहू सलोखा मंचच्या वतीने शुक्रवारी शाहू स्मारक भवनात विविध संघटना व शाहू प्रेमीची बैठक घेण्यात आली. मल्हारसेनेचे प्रमुख बबन रानगे यांनी प्रास्ताविकामध्ये बैठकीचा उद्देश सांगितला.
शाहू महाराज यांचे ६ मे १९२२ रोजी मुंबईतील खेतवाडी येथे निधन झाले. मात्र दुर्दैवाने तिथे साधा फलकही नाही. तिथे स्मृतिस्तंभ उभा करत असतानाच जन्मभूमी ते स्मृतिस्तंभ अशी रथयात्रा काढावी, अशी सूचना रानगे यांनी केली.
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, राजर्षी शाहूंचा मुंबईत स्मृतिस्तंभ उभारला पाहिजेच, त्याचबरोबर त्यांच्या विचाराचे जागरण झाले पाहिजे. त्यांच्या जयंती शताब्दीनिमित्त शाहू स्मारक उभारण्याचा संकल्प केला आणि तो पूर्णही झाला. त्याप्रमाणे आता नवीन संकल्प करून त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करुया.
मंचचे निमंत्रक वसंतराव मुळीक म्हणाले, खेतवाडी येथे स्मृतिस्तंभ व्हावा, यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली आहे. ते सकारात्क असून स्मृतिस्तंभ होईलच, त्याचबरोबर त्यांच्या विचाराचा जागर होण्याची गरज आहे. स्मृती शताब्दीनिमित्त परराज्य व परजिल्ह्यातील शाहू प्रेमींनी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये कोल्हापूरकर मागे पडणार नाहीत. अशोक भंडारी, बी. के. कांबळे, हसन देसाई, छगन नांगरे, पंडित कंदले, दिलीप सावंत, कादर मलबारी आदींनी सूचना केल्या.
घरघरांत शाहूंचे चित्र आणि विचार
स्मृती शताब्दीनिमित्त राजर्षि शाहू सलोखा मंचच्यावतीने कोल्हापुरातील प्रत्येक घरात शाहू महाराजांचे फोटो (चित्र) व त्याखाली त्यांचा एक विचार पोहचवण्याची जबबादारी घ्यावी, अशी सूचना इंद्रजित सावंत यांनी केली.
बैठकीत असे झाले ठराव
- शाहू जन्मस्थळ ते मुंबई येथील खेतवाडी काढण्यात येणाऱ्या शाहू विचार यात्रेमध्ये जास्तीत जास्त लोक सहभागी व्हावे.
- राज्य शासनाने मुंबई येथील खेतवाडी या ठिकाणी स्मृतिशताब्दी वर्षात स्मृतिस्तंभ उभारावा.
- स्मृतिशताब्दी वर्षामध्ये म्हणजेच ६ मे २०२३ पर्यंत राजर्षी शाहू समाधी स्मारक स्थळाचे काम पूर्ण करावे.
अशा केल्या सूचना
- शाहू जन्मस्थळ ते निधनस्थळ मुंबई सामाजिक समता यात्रा काढावी.
- सामाजिक समतेची नगरीत कोल्हापुरात शाहू सामाजिक एकोपा परिषद घ्या.
- राज्यस्तरीय शाहू स्मृतिशताब्दी समितीच्या पूरक कार्यक्रम राबविणे, त्यांना सहकार्य करा.
- राज्यस्तरीय व्याख्यानमाला तसेच जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये शाहू महाराजांच्या कार्याविषयी व्याख्यानांचे आयोजन करा.
- शाहू चित्रमय चरित्र व त्यांच्या दुर्मीळ ऐतिहासिक दस्तऐवजांचे प्रदर्शन घ्या.
- राज्यस्तरीय राजर्षी शाहू ग्रंथ प्रदर्शन
- कुस्ती स्पर्धा, संगीत स्पर्धा राज्य शासनाने घ्याव्यात.
- ६ मे २०२२ रोजी राज्य शासनाने राजर्षी शाहू स्मृतिशताब्दी दिन जाहीर करून ग्रामपातळीवर कार्यक्रम आयोजित करावेत.