शाहू महाराज विचार दिंडीला उदंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 05:22 PM2020-01-18T17:22:02+5:302020-01-18T17:24:45+5:30
राजर्षी शाहू महाराज यांच्या नर्सरी बागेतील समाधिस्थळाच्या लोकार्पण सोहळ्यामुळे कोल्हापुरात ‘शाहूमय’ वातावरण निर्माण झाले आहे. सोहळ्यानिमित्त शनिवारी शहरातील प्रमुख मार्गावरून ‘शाहू महाराज विचार दिंडी’ काढण्यात आली.
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या नर्सरी बागेतील समाधिस्थळाच्या लोकार्पण सोहळ्यामुळे कोल्हापुरात ‘शाहूमय’ वातावरण निर्माण झाले आहे. सोहळ्यानिमित्त शनिवारी शहरातील प्रमुख मार्गावरून ‘शाहू महाराज विचार दिंडी’ काढण्यात आली.
या दिंडीमध्ये शहरातील महापालिकेच्या तसेच खासगी शाळेतील मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांनी सादर केलेले झांज पथक, लेझीम, मर्दानी खेळ, कुस्ती, मल्लखांबच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.
कोल्हापूरकरांच्यावतीने गेल्या तीन दिवसांपासून शाहू समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. शुक्रवारी याचाच एक भाग म्हणून शहरातून शाहू महाराज विचार दिंडी काढण्यात आली.
बिंदू चौक येथे सकाळी महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख, विरोधी पक्ष नेते विजय सूर्यवंशी, समिती सदस्य वसंतराव मुळीक यांची प्रमुख उपस्थित होती. यानंतर दिंडी बिंदू चौक, लक्ष्मीपुरी येथील आईसाहेब महाराज पुतळा, ऐतिहासिक दसरा चौक मार्गे राजर्षी शाहू महाराज समाधी स्मारक स्थळ येथे आली.
दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांना कोल्हापूर हॉटेल मालक संघाने अल्पोपहाराचे वाटप केले. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, समिती सदस्य इंद्रजित सावंत, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, जय पटकारे, तौफीक मुल्लाणी, दिलीप देसाई, राजेश लाटकर, रियाज सुभेदार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, अशोक पोवार, रमेश मोरे, आदी उपस्थित होते.
आयुक्त खेळले लेझीम
समाधिस्थळी लेझीम खेळत आलेल्या शालेय मुलांच्या दिंडीत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनीही सहभाग घेतला. त्यांनी लेझीम खेळत आनंदोत्सव साजरा केला. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक अशोक जाधव, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, राजेश लाटकर, कादर मलबारी, गणी आजरेकर यांनीही सहभाग घेतला.
समाज सुधारकांच्या वेशभूषेत बालचमू
प्राथामिक शाळेतील शेकडो विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. यामध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्यासह स्वामी विवेकानंद, महात्मा जोतिबा फुले, सवित्रीबाई फुले, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा महाराज, अशा समाजसुधारकांच्या वेशभूषेतील बालचमू दिंडीचे विशेष आकर्षण ठरले.