Shahu Maharaj Jayanti Kolhapur : ऐतिहासिक "माणगाव परिषद-१९२०" लघुपटाचे ऑनलाईन लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 15:20 IST2021-06-26T15:16:57+5:302021-06-26T15:20:31+5:30
Shahu Maharaj Jayanti Kolhapur : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालय निर्मित "माणगाव परिषद-१९२०" या लघुपटाचे ऑनलाईन लोकार्पण सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. हा ऐतिहासिक ठेवा या लघुपटाच्या माध्यमातून समोर आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.

Shahu Maharaj Jayanti Kolhapur : ऐतिहासिक "माणगाव परिषद-१९२०" लघुपटाचे ऑनलाईन लोकार्पण
कोल्हापूर : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालय निर्मित "माणगाव परिषद-१९२०" या लघुपटाचे ऑनलाईन लोकार्पण सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. हा ऐतिहासिक ठेवा या लघुपटाच्या माध्यमातून समोर आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.
या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम, श्री श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, राज्य वित्त आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, ऊर्वरीत वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, संभाजीराजे छत्रपती, खासदार संजय मंडलीक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह जिल्ह्यातील विधीमंडळ सदस्य आदी ऑनलाईन सहभागी झाले होते.
लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थित १९२० साली झालेल्या परिषदेला १०१ वर्षपूर्ती निमित्ताने हा लघुपट प्रतिकात्मक स्वरुपात तयार केला आहे.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती बनविण्यात आली होती. ज्येष्ठ विचारवंत आणि इतिहास तज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि संवादशास्त्र विभागप्रमुख डॉ. निशा मुडे, शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांचा या समितीत समावेश होता. पुण्याच्या रिडिफाईन कॉन्सेप्टस या संस्थेचे योगेश देशपांडे यांनी याची निर्मिती-दिग्दर्शन केले आहे तर या निर्मितीत प्रशांत सातपुते यांच्यासह जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही आपले योगदान दिले.
या लोकार्पण प्रसंगी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन / मा ) गणेश रामदासी (माहिती संचालक ) गोविंद अहंकारी यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत केले. सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी प्रास्ताविकात लघुपटनिर्मितीमागील पार्श्वभूमी सांगितली. मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिरुध्द अष्टपुत्रे यांनी सर्वांचे आभार मानले.