कोल्हापूरात समता रॅलीतून शाहू महाराजांचा जयजयकार
By admin | Published: June 26, 2017 03:11 PM2017-06-26T15:11:56+5:302017-06-26T15:11:56+5:30
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग : प्रबोधनपर फलकांनी लक्ष वेधले
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २६ : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय...असा अखंड जयघोष...आकर्षक चित्ररथातून उलगडलेला राजर्षी शाहूंचा जीवनपट...प्रबोधनपर फलक...झांज पथकांचा दणदणाट....लेझीम पथकांचा कलाविष्कार....असे उत्साही वातारण सोमवारी सकाळी पहायला मिळाले. निमित्त होतं, राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित समता रॅलीचे.
यावेळी शाहूंच्या जयजयकाराने दसरा चौक दुमदुमला. सकाळी साडे आठच्या सुमारास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी शाहू छत्रपती, महापौर हसिना फरास, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार सतेज पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हापरिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी कुणाल खेमणार,महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत आदी प्रमुख उपस्थित होते.
यानंतर समता रॅलीला सुरुवात झाली. यामध्ये शाहू महाराजांची वेषभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राजर्षी शाहूंचा जीवनपट शालेय विद्यार्थ्यांनाी तयार केलेल्या चित्ररथातून उलगडण्यात आला. विद्यार्थीनींच्या लेझीम पथकाच्या कलाविष्काराने अंगावर रोमांच उभे राहात होते. त्याचबरोबर झांज पथकाच्या गजरात राजर्षी शाहू महाराज की जय अशा अखंड घोषणांनी रॅली मार्ग दुमदुमून गेला. रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ही रॅली व्हिनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी चौक, महापालिका, सीपीआरमार्ग दसरा चौक येथे येऊन रॅलीचा समारोप झाला.
रॅलीमध्ये महापालिका स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार, माजी महापौर आर. के. पोवार, नगरसेवक अशोक जाधव, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, माजी नगरसेवक राजू लाटकर, शाहिर दिलीप सावंत, कादर मलबारी, राजदीप सुर्वे, महादेव पाटील, आर. डी. पाटील, यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आदी सहभागी झाले होते.
‘महाराष्ट्र’च्या विद्यार्थीनींच्या लेझीम पथकाचा अविष्कार
समता रॅलीमध्ये महाराष्ट्र हायस्कूलच्या विद्यार्थींनींच्या लेझीम पथकाने उत्कृष्ट कलाविष्कार सादर करत उपस्थितांच्या अंगावर रोमांचे उभे केले. ‘विद्यापीठ’चे लक्षवेधी प्रबोधनपर फलक या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यापीथ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या हातातील ‘जाणता राजा शाहू’, ‘समतावादी लोकराजा राजर्षी शाहू’, ‘राजर्षी शाहूंचा उपक्रम प्राथमिक शिक्षणाला अग्रक्रम’ असे प्रबोधनपर फलक सर्वांचे लक्ष वेधत होते.