‘शाहू समाधी’वरून काँग्रेस-राष्ट्रवादीत ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 01:05 AM2019-08-29T01:05:05+5:302019-08-29T01:05:09+5:30

कोल्हापूर : नर्सरी बागेतील छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचे काम अपूर्ण असताना लोकार्पणाची घाई का करीत आहात, आधी ...

Shahu mausoleum sparks congressional-nationalism | ‘शाहू समाधी’वरून काँग्रेस-राष्ट्रवादीत ठिणगी

‘शाहू समाधी’वरून काँग्रेस-राष्ट्रवादीत ठिणगी

Next

कोल्हापूर : नर्सरी बागेतील छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचे काम अपूर्ण असताना लोकार्पणाची घाई का करीत आहात, आधी कामे पूर्ण करा मगच लोकार्पण करा, असा आग्रह उपमहापौर भूपाल शेटे यांनी धरल्यामुळे रविवारी होणाऱ्या कार्यक्रमाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. रविवारी हा कार्यक्रम होणारच, असे राष्टÑवादी कॉँग्रेसकडून सांगण्यात आले, तर कोणाच्या तरी हट्टापायी कार्यक्रम घेतला तर आम्ही कार्यक्रमास जाणार नाही, असा पवित्रा कॉँग्रेस नगरसेवकांनी घेतल्याने दोन्ही पक्षांतील मतभेद अधिक स्पष्ट झाले.
महापौर माधवी गवंडी यांनी कार्यक्रम निश्चित केल्यानंतर २४ तासांत उपमहापौरांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे या वादाला वेगळे वळण लागले. महापौरांनी आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांना भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाटील यांची भेट झाली नाही. मुश्रीफ यांनी रविवारीच कार्यक्रम होईल, सतेज पाटील यांच्याशी बोलून गैरसमज दूर करतो, असे सांगितले. मात्र, तरीही कार्यक्रमाबाबत संभ्रम कायम राहिला.
सोमवारी शाहू समाधी स्मारक स्थळावर आढावा बैठक झाल्यानंतर मंगळवारी महापौर माधवी गवंडी, त्यांचे पती प्रकाश गवंडी व माजी नगरसेवक आदिल फरास यांनी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना आमंत्रण दिले आणि रविवारी सकाळी दहा वाजता लोकार्पण कार्यक्रम निश्चित केला. त्याचे वृत्त बुधवारी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याचे पाहून अनेक पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी अचंबित झाले. उपमहापौर भूपाल शेटे, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्मारकस्थळावर जाऊन कामाचा आढावा घेतला. त्यावेळी ठेकेदार व्ही. के. पाटील यांनी लॉन, संरक्षक भिंतीवरील कॅपिंग, फ्लडलाईट, शिर्के उद्यानातील प्रवेशद्वार, आदी कामे पूर्ण व्हायची असल्याचे सांगितले.
आयुक्त कलशेट्टी, उपमहापौर शेटे समाधिस्थळावर पुन्हा जाऊन माहिती घेल्याचे समजताच महापौर गवंडी, आदिल फरास हेही तेथे पोहोचले. कामे अपूर्ण असताना कार्यक्रमाची घाई कशाकरता करता? अशी उघड भूमिका उपमहापौर शेटे यांनी घेतली. त्यावर सायंकाळी महापालिकेत बैठकीत यावर चर्चा करूया असे सांगितले.
सायंकाळी झालेल्या बैठकीत महापौर, उपमहापौर, आयुक्तांसह स्मारक समितीचे सदस्य, अधिकारी उपस्थित होते. बैठकीत उपमहापौर शेटे यांनी रोखठोक भूमिका घेतली. कार्यक्रम लांबला तरी चालेल; पण अर्धवट कामे पूर्ण करा, असे त्यांनी सांगितले. मी सकाळी समाधिस्थळास भेट दिली तेव्हा काही कामे व्हायची आहेत, असे सांगितले. अर्धवट कामाचे लोकार्पण करणे योग्य नाही. कामे पूर्ण होऊ देत. शिवाय कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी, बाळासाहेब थोरात यांना कार्यक्रमास बोलावणार आहोत, त्यामुळे रविवारचा कार्यक्रम स्थगित करावा, अशी भूमिका शेटे यांनी घेतल्यामुळे महापौर गवंडी, फरास यांची पंचाईत झाली.
कार्यक्रम होऊ देत म्हणणारा एक गट व पुढे ढकला म्हणणारा दुसरा गट आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे वाद व चर्चा झाली. समिती सदस्य इंद्रजित सावंत यांनी कार्यक्रमात राजकारण येता कामा नये, कार्यक्रम स्थगित केला तर राजकारणामुळे कार्यक्रम पुढे गेला असा संदेश जाईल, अशी भीती व्यक्त केली.
मेहजबीन सुभेदार संतप्त होऊन, माझ्या भागातील कार्यक्रम असूनही मला वृत्तपत्रातून बातमी कळली. अपूर्ण काम असताना कार्यक्रमाचा कशाला घाट घातला जातोय, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. अखेरीस आघाडीचे नेते आ. हसन मुश्रीफ व आम. सतेज पाटील यांना भेटण्याचा निर्णय घेऊन महापौर गवंडी यांनी बैठक आटोपती घेतली.

Web Title: Shahu mausoleum sparks congressional-nationalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.