शाहू स्मारकालाही अनागोंदीचे ग्रहण कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष : नवे काही घडत नसल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 01:45 PM2018-10-03T13:45:17+5:302018-10-03T13:52:59+5:30
कोल्हापूरच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, पुरोगामी चळवळीचे केंद्र असलेल्या शाहू स्मारक भवनच्या कारभाराला अनागोंदीचे ग्रहण लागले आहे. ट्रस्टवर जिल्हा प्रशासनासह सात अधिकारी सदस्य असतानाही केवळ दुर्लक्षामुळे रेंगाळलेली
इंदुमती गणेश
कोल्हापूर : कोल्हापूरच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, पुरोगामी चळवळीचे केंद्र असलेल्या शाहू स्मारक भवनच्या कारभाराला अनागोंदीचे ग्रहण लागले आहे. ट्रस्टवर जिल्हा प्रशासनासह सात अधिकारी सदस्य असतानाही केवळ दुर्लक्षामुळे रेंगाळलेली विश्वस्तांची नियुक्ती, गळका हॉल, नूतनीकरणाचा अभाव, एकहाती कारभार, पारदर्शकतेचा अभाव अशा भोवऱ्यांचा विळखा भवनाला बसला आहे.
दसरा चौकातील ‘शाहू स्मारक भवन’ ही केवळ वास्तू नव्हे, तर ती पुरोगामी कोल्हापूरच्या इतिहासाची साक्षीदार आहे. या वास्तूत अनेक चळवळी आकाराला आल्या आणि तडीस गेल्या. या वास्तूच्या नावे असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी, तर सचिव म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी काम पाहतात. याशिवाय दोन विश्वस्त, महापौर, जिल्हा पोलीसप्रमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, कुलगुरू, सार्वजनिक बांधकामचे अभियंता हे सदस्य आहेत. एवढे सगळे शासकीय अधिकारी व पदाधिकारी असतानाही शाहू स्मारक भवनकडे सर्वांचेच साफ दुर्लक्ष झाले आहे.
सहा वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी जातीने लक्ष घालून शाहू स्मारकचा कायापालट केला, सांस्कृतिक उपक्रम राबविले. त्यानंतर मात्र एकाही जिल्हाधिकाºयांनी यात रस घेतला नाही. शाहू पुरस्कार, व्याख्यानमाला असे मोजके कार्यक्रम सोडले तर ट्रस्टकडून फार काही घडत नाही. नियमित बैठका होत नसल्याने अडचणींवर चर्चा होत नाही.
ट्रस्टवर विश्वस्त म्हणून सध्या केवळ ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार हे आहेत; तर डॉ. अशोक चौसाळकर हे निमंत्रित आहेत. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी विश्वस्तपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागी नवी नियुक्तीच झालेली नाही. अभ्यासिकेचा प्रस्ताव फाईलबंद आहे. नूतनीकरणादरम्यान झालेल्या काही चुकांमुळे पावसाळ्यात व्यासपीठावरच पाणी गळते. दुसरीकडे, वास्तूची व स्वच्छतागृहाची साफसफाई होत नाही. वास्तूचा नीटनेटकेपणा, आकर्षकता, पिण्याचे पाणी, कार्यक्रमाची माहिती लावण्यासाठी सुस्थितीतीलस्टॅँडी, अशा मूलभूत सोर्इंचाही अभाव आहे. शाहूंच्या नावाने चालविल्या जाणाºया या वास्तूसंबंधी अधिक दक्षतेने कामकाज होणे गरजेचे आहे.
रेस्ट हाऊस बंद
मुख्य इमारतीमागील रेस्ट हाऊस टेंडर नोटिसीद्वारे चालवायला दिले जायचे. त्यातून वर्षाला चार लाखांचे उत्पन्न मिळायचे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून ही प्रक्रियाच केली गेली नाही. जी प्रक्रिया झाली ती चुकीची होती. व्यावसायिकांनी त्याकडे पाठ फिरविल्याने मोठा फटका बसला आहे. आता त्याला गळतीच लागली आहे. जे लोक येथे राहायला येतात, त्यांची नोंदच होत नाही, अशी तक्रार आहे.
आर्थिक अडचणी
धर्मादाय अंतर्गत असलेल्या शाहू स्मारक भवनाची वार्षिक उलाढाल जवळपास ५० लाख इतकी आहे. ट्रस्टला शासनाकडून एक रुपयाही मिळत नाही. तीन हॉल व दोन कलादालनांच्या बुकिंगमधूनच उत्पन्न मिळते. रोजचा खर्च दहा ते बारा हजारांच्या आसपास आहे; त्यामुळे ट्रस्टकडे निधी नाही. त्यातून नूतनीकरण रखडले आहे. येथे सगळे व्यवहार रोखीने होतात. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता नाही, साहित्य परस्पर भाडेतत्त्वावर दिले जाते, अधिकच्या सेवा व साहित्यासाठी वाढीव भाडे द्यावे लागते, आगाऊ बुकिंग करून अडवणूक होते, काही ठिकाणी अनावश्यक खर्च दाखविला जातो, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.