‘शाहू’चे आता पंधरा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:25 AM2021-04-01T04:25:35+5:302021-04-01T04:25:35+5:30
कागल : पुढील दहा वर्षांतील तंत्रज्ञानाचा विचार करून विस्तारीकरण केले. हंगामात अडचणही येऊ दिली नाही. त्याच्या ...
कागल : पुढील दहा वर्षांतील तंत्रज्ञानाचा विचार करून विस्तारीकरण केले. हंगामात अडचणही येऊ दिली नाही. त्याच्या परिणामी उच्चांकी गाळप क्षमता झाली आहे. कारखान्याच्या पुढील पाच वर्षांच्या विकासात्मक वाटचालीचे नियोजन तयार आहे. आता यापुढे शाहू साखर कारखान्याचे १५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट राहील. त्यासाठी आपण सर्व प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.
शाहू साखर कारखान्याच्या ४१ व्या गळीत हंगामाची समाप्ती व उच्चांकी ऊस गळीत उद्दिष्टपूर्ती समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सुहासिनीदेवी घाटगे, प्रवीणसिंह घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे, माजी मंत्री वीरकुमार पाटील, नंदितादेवी घाटगे, नवोदिता घाटगे, उदयबाबा घोरपडे, सागर कोंडेकर प्रमुख उपस्थित होते.
कारखान्याने दहा लाख सतरा हजार टन उसाचे गाळप केल्याबद्दल समरजित घाटगे यांचा कर्मचारी संघटना, तोडणी-वाहतूक संस्था, कर्मचारी पतसंस्थेसह शेतकऱ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच नागपूर येथे झालेल्या हिंदकेसरी स्पर्धेत दिनानाथसिंह यांनी ‘हिंदकेसरी’ किताब मिळविला, त्याला २७ मार्च २०२१ रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आज शाहू ग्रुपच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिला कुस्तीगीर सृष्टी भोसले, सोनल सावंत, कराटेपटू संस्कार पाटील, ओम दावणे या खेळाडूंचाही सत्कार केला.
यावेळी प्रकाश कदम (कोगनोळी), संजय बरकाळे (जैन्याळ), व्ही. डी. कुलकर्णी (दिंडनेर्ली), उत्तम पाटील (बाचणी) यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत अमरसिंह घोरपडे यांनी केले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले, तर युवराज पाटील यांनी आभार मानले.
● विक्रमसिंह घाटगेंच्या आठवणीने भारावले...
समरजित घाटगे म्हणाले, ‘या हंगामात १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा पार केलेला टप्पा हा कारखान्याच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. हा क्षण पाहण्यासाठी कारखान्याचे संस्थापक राजे विक्रमसिंह घाटगे असायला हवे होते. सर्वच घटकांनी हे उद्दिष्ट पार करण्यासाठी पराकाष्टा करीत खऱ्याअर्थाने राजेसाहेबांच्या स्मृती जपल्या आहेत. त्यांच्या निधनादिवशी कर्मचारी वर्गाने अश्रू ढाळीत आपले काम सुरू ठेवून, राजेंनी आखून दिलेल्या शिस्तीचे पालन केले.’ या आठवणीने सर्वजण भारावले.
छायाचित्र -
कागल येथे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ४१ व्या गळीत हंगामाची समाप्ती व उच्चांकी ऊस गळीत उद्दिष्टपूर्ती समारंभप्रसंगी समरजितसिंह घाटगे यांनी मार्गदर्शन केले.