देशातील मोजक्या साखर कारखान्यात ‘शाहू’चा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:18 AM2021-01-01T04:18:07+5:302021-01-01T04:18:07+5:30
४३ वी वार्षिक सभा. कागल : केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर करण्याबरोबरच इथेनाॅल निर्मितीचे जाहीर केलेले धोरण ...
४३ वी वार्षिक सभा.
कागल : केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर करण्याबरोबरच इथेनाॅल निर्मितीचे जाहीर केलेले धोरण साखर उद्योगास आर्थिक संजीवनी देणारे आहे. या धोरणास अनुसरून शाहू साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीचा नवीन उपक्रम हाती घेतला. तो हंगामाच्या पहिल्या दिवसापासून यशस्वीपणे सुरू आहे. असे उत्पादन घेणारे देशात मोजके साखर कारखाने आहेत. त्यात आपल्या शाहू साखर कारखान्याचा समावेश आहे, असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले. कारखान्याच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
ज्येष्ठ संचालिका सुहासिनीदेवी घाटगे, माजी मंत्री वीरकुमार पाटील, सर्व संचालक तसेच शाहू दूध संघाच्या कार्यकारी संचालिका नवोदिता घाटगे आणि अन्य प्रमुख पदाधिकारी सभासदांमध्ये उपस्थित होते.
सर्वोत्कृष्ट साखर कारखाना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल समरजित घाटगे यांचा सभासदांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विषयपत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले.
स्वागत कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी केले, तर आभार संचालक युवराज पाटील यांनी मानले.
चौकटी .
● कोरोनाची दक्षता घेत सभा....
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वार्षिक सभेसाठी कारखान्याने विविध उपाययोजना केल्या होत्या. सामाजिक अंतर राखणारी बैठक व्यवस्था. संपूर्ण सभामंडप आणि सभासद नोंदणी ठिकाण सॅनिटायझिंग, तसेच सभामंडपात प्रवेश करताना सॅनिटायझर आणि पॅकबंद मिनरल पाणी देण्यात येत होते.
● एफआरपीत वाढ होणार...
साखर उताऱ्याबद्दल समरजित घाटगे म्हणाले की, इथेनॉल करणाऱ्या कारखान्यांचा साखर उतारा इतर कारखान्यांच्या तुलनेत वर्तमानपत्रांमध्ये वाचताना कमी वाटतो. परंतु एफआरपी निश्चित करीत असताना झालेले साखर उत्पादन अधिक इथेनॉल उत्पादन करण्यासाठी वापरलेली साखर, अशी एकत्र करून एफआरपी निश्चित केली जाते. त्यामुळे गतवेळेपेक्षा चालूवर्षी आपला साखर उतारा आणि एफआरपी वाढलेलीच असेल.
छायाचित्र-
कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष समरजित घाटगे यांनी मार्गदर्शन केले.