शाहू विचारांत समाजाला पुढे नेण्याची प्रेरणा - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 05:53 AM2020-01-20T05:53:26+5:302020-01-20T05:55:16+5:30
हातातील सत्ता आपली नाही तर ती रयतेसाठी आहे. हे सूत्र घेऊन काम करणारा राजा म्हणून राजर्षि शाहू यांची ओळख संपूर्ण देशात झाली. त्यांचे कर्तृत्व दक्षिणेत, उत्तरेत पाहायला मिळते, घराघरांत शाहूंच्या कर्तृत्वाचा अभिमान पाहायला मिळतो, असे पवार म्हणाले.
कोल्हापूर : सर्वांगीण विकासासाठी केवळ विचार आणि दृष्टी असून उपयोगाची नाही तर प्रत्यक्षात विचारांना अनुसरून कृती करायला पाहिजे. हे जाणणारा द्रष्टा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधी स्मारक नव्या पिढीला आधुनिकतेचा, समतेचा विचार देईल, लोकशाहीचे महत्त्व पटवून देईल आणि विकासाच्या वेगवेगळ््या भूमिका स्वीकारून पुढे कसे जायचे आणि यशस्वी कसे व्हायचे, यादृष्टीने प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रविवारी येथे बोलताना केले.
कोल्हापूर महानगरपालिकेने स्वनिधीतून पावणेतीन कोटी रुपये खर्चून येथील नर्सरी बागेत बांधलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारक लोकार्पण सोहळ््यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संभाजीराजे, मालोजीराजे आदी उपस्थित होते.
देशात राजे अनेक होऊन गेले, संस्थाने अनेक होऊन गेली. परंतु समाजाचे सत्व जागे करून उपेक्षित, शोषित, पीडित समाजाला संघटित करून राज्य प्रस्थापित करण्याची कामगिरी शिवछत्रपतींनी केली. हातातील सत्ता आपली नाही तर ती रयतेसाठी आहे. हे सूत्र घेऊन काम करणारा राजा म्हणून राजर्षि शाहू यांची ओळख संपूर्ण देशात झाली. त्यांचे कर्तृत्व दक्षिणेत, उत्तरेत पाहायला मिळते, घराघरांत
शाहूंच्या कर्तृत्वाचा अभिमान पाहायला मिळतो, असेही पवार म्हणाले.
कोल्हापूर गादीवर दत्तक आल्यापासून मृत्यूपर्यंत शाहू महाराज यांनी केलेल्या कार्याचे उदाहरणांसह अनेक घटनांचे वर्णन करून पवार यांनी कोल्हापूरकरांना चकीत तर केलेच शिवाय आपल्या अफाट स्मरणशक्तीची जाणीव देखील करून दिली.
दुसरा टप्पा सुरु करा
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुसऱ्या टप्प्यातील कामाला आतापासूनच सुरुवात करा. समाधी स्मारकाचे काम पूर्ण झाल्यानंतर तो कार्यक्रम मुंबईत घेऊ. शाहूंच्या विचाराचा संदेश जगात गेला पाहिजे, असे सांगितले.