शाहू समाधी स्मारकाचे लोकार्पण लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 11:14 AM2019-08-27T11:14:27+5:302019-08-27T11:15:59+5:30
कोल्हापूर : येथील नर्सरी बागेत बांधण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचे काम जवळपास पूर्ण झाले ...
कोल्हापूर : येथील नर्सरी बागेत बांधण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, अंतिम टप्प्यातील सर्व कामे येत्या आठ दिवसांत पूर्ण होतील, असा निर्वाळा अधिकारी तसेच ठेकेदार यांनी दिला आहे. समाधी स्मारक लोकार्पण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात केले जाणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना दोन दिवसांत निमंत्रण देण्यात येईल, असे महापौर माधवी गवंडी यांनी सांगितले.
शाहू स्माारक समाधी कामाची सोमवारी महापौर गवंडी, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पाहणी करून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी माजी महापौर हसीना फरास, नगरसेवक अशोक जाधव, जय पटकारे, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, माजी नगरसेवक आदिल फरास, नंदकुमार मोरे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, ठेकेदार व्ही. के. पाटील, आर्किटेक्ट अभिजित जाधव, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक उपस्थित होते.
समाधिस्थळावर करावयाची पहिल्या टप्प्यातील सर्व कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. आता अंतिम टप्प्यातील कामे गतीने सुरू आहेत. या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काम काहीसे थांबले होते. लावण्यात आलेली नैसर्गिक हिरवळीचे नुकसान झाले. ती पुन्हा लावली जात आहे. चबुतरा, मेघडंबरी, पदपथ, इलेक्ट्रीक कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित किरकोळ काम येत्या आठ दिवसांत पूर्ण केली जातील, असे सांगण्यात आले.
समाधी परिसरातील शिवाजी महाराज व छत्रपती ताराराणी यांच्या मंदिराची डागडुजी करण्यावर चर्चा झाली. ही मंदिरे छत्रपती घराण्याच्या मालकीची असल्याने त्यांच्या परवानगीने ती पूर्ण करावीत, तर शेजारी बाबासाहेब आंबेडकर हॉलवरील झाडेझुडपे तातडीने काढावीत, परिसरातील दोन तीन झाडांच्या फांद्या छाटाव्यात, मुख्य प्रवेशद्वाराजवळील इलेक्ट्रीक खांब स्थलांतर करण्याबाबत महावितरणला कळविण्यात यावे, अशा सूचना आयुक्त कलशेट्टी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
शाहू समाधी स्मारक लोकार्पण कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शाहू छत्रपती यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज, मंगळवारी किंवा उद्या, बुधवारी निमंत्रण देऊन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.