शाहू समाधी चारी बाजूने बंदिस्तच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 01:13 AM2019-05-14T01:13:17+5:302019-05-14T01:13:22+5:30
कोल्हापूर : नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकासंबंधी सिद्धार्थनगरातील नागरिकांनी केलेल्या मागण्यांवर सोमवारी महापौर सरिता मोरे ...
कोल्हापूर : नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकासंबंधी सिद्धार्थनगरातील नागरिकांनी केलेल्या मागण्यांवर सोमवारी महापौर सरिता मोरे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत ठोस निर्णय झाला नसल्याने या विषयावरून वाद वाढण्याची शक्यता आहे. सिद्धार्थनगराच्या बाजूला स्वतंत्र प्रवेशद्वार ठेवल्याशिवाय संरक्षक भिंतीचे काम सुरू करू नये, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे, तर पावित्र्य आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्मारक बंदिस्त राहील, असे महापौरांनी स्पष्ट केले.
शाहू समाधी स्मारकचे काम पूर्णत्वास येण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा तसेच सिद्धार्थनगरातील नागरिकांनी केलेल्या मागण्यांवर विचार करण्याकरिता सोमवारी दुपारी महापौर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ताराराणी सभागृह येथे बैठक झाली. मात्र, बैठकीत तोडगा निघाला नाही. उलट हा वाद वाढण्याचीच अधिक शक्यता निर्माण झाली.
उपमहापौर भूपाल शेटे यांनी स्मारकाची माहिती दिली. सिद्धार्थनगरातील नागरिकांनी केलेल्या काही मागण्या मान्य करण्यासारख्या आहेत; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे असलेल्या सांस्कृतिक हॉलमधील व्यायामशाळा भगतसिंग तरुण मंडळाजवळील हॉलमध्ये स्थलांतर करावी लागणार असल्याचे सांगितले. संरक्षक भिंत घालण्यामागे स्मारकाचे पावित्र्य आणि सुरक्षितता जपण्याकरिता एकच मुख्य प्रवेशद्वार ठेवणार असून, चारी बाजूने भिंत असेल, असे शेटे यांनी सांगितले.
सिद्धार्थनगराकडील बाजूला नागरिकांकरिता स्वतंत्र प्रवेशद्वार करावे, तेथील नागरिक रोज ये-जा करतात. उद्या भिंत घातल्यावर नागरिकांनी कुठून जायचे, अशी विचारणा वसंत लिंगनूरकर यांनी केली. व्यायामशाळाही तेथून हलवू नये, अशी विनंती त्यांनी केली. आंबेडकर हॉलचे बांधकाम करून वरील मजल्यावर ग्रंथालय, अभ्यासिका कराव्यात, असेही लिंगनूरकर यांनी सांगितले. त्यावेळी या हॉलमध्ये शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित आर्ट गॅलरी असणार आहे, त्यामुळे तेथील व्यायामशाळा स्थलांतर करावी लागेल, असे महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
यावेळी परिवहन सभापती अभिजित चव्हाण, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, प्रभाग समिती सभापती हसिना फरास, नगरसेविका मेहेजबिन सुभेदार, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अफजल पिरजादे, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, उपशहर अभियंता एस. के. माने, आर्किटेक्चर अभिजित जाधव, ठेकेदार व्ही. के. पाटील, वसंतराव मुळीक उपस्थित होते.