शाहू समाधीचा संकल्प सत्यात उतरणार काय?
By admin | Published: June 25, 2015 01:05 AM2015-06-25T01:05:58+5:302015-06-25T01:05:58+5:30
चिंता शाहूप्रेमींना सतावत आहे.
संतोष पाटील/ कोल्हापूर
राजर्षी शाहू महाराज यांनी हयात असतानाच आपली समाधी उभारण्याची इच्छा व्यक्त केली होती. पुढील पिढीला शाहूंच्या विचारांनी प्रेरणा देणारे समाधिस्थळ नर्सरी बाग (सी वॉर्ड, सि.स.नं.२९४८) येथे उभारण्याचा संकल्प महापालिका प्रशासनाने केला आहे. सात कोटी रुपयांच्या या समाधिस्थळासाठी मनपाकडे फक्त ७५ लाख रुपयांचीच उपलब्धता आहे. राज्य शासनाच्या मदतीशिवाय समाधिस्थळ विकासाचा संकल्प सत्यात कसा उतरणार, याची चिंता शाहूप्रेमींना सतावत आहे.
राजर्षी शाहू महाराज यांनी सी वॉर्डातील नर्सरी बाग येथे आपल्या समाधीची व्यवस्था करावी, असे १३ सप्टेंबर १९१६ मध्ये आदेशात लिहून ठेवले आहे. या आदेशात शाहू महाराजांनी त्यांच्या समाधीची जागा नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराजवळ निश्चित करून ठेवली. समाजातील दीन-दलित, बहुजनांच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचे विचार व कार्य पुढील पिढीला प्रेरणादायी ठरावेत, यासाठी समाधिस्थळ व परिसर विकसित करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.
शाहू समाधिस्थळ येथील थोडीच जागा महापालिकेने संपादित केली आहे. शाहू समाधिस्थळ विकसित करण्यासाठी १०७६९ चौरस मीटर इतक्या जागेची आवश्यकता आहे. महापालिका प्रशासनाने ७५५३ चौरस मीटर जागा यापूर्वीच ताब्यात घेतली आहे. उर्वरित आवश्यक ३२१५ चौरस मीटर जागा छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट यांच्या मालकीची आहे. राजर्षी शाहू महाराज यांचा समाधिस्थळ परिसर विकसित करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी विनंती श्रीमंत शाहू छत्रपती, युवराज संभाजीराजे व माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांना महापालिकेने केली. ‘शाहूंच्या विचारास शोभेल, पवित्र राहील, असे समाधिस्थळ करा, आमची
काही हरकत नाही. हव्या त्याप्रकारे कागदोपत्री सोपस्कार आम्ही
पूर्ण करू’, असे आश्वासन श्रीमंत शाहू महाराज यांनी मनपाला दिले आहे.
सध्या या जागेवर हिरवा पट्टा (ग्रीन झोन) आरक्षण आहे. नगररचना कायदा ‘कलम ३७’ अन्वये यामध्ये पब्लिक झोन (सार्वजनिक वापर) असा बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. समाधिस्थळ विकसित करण्यासाठी महापालिकेचा ४ कोटी ७ लाख ४४ हजार रुपयांचा विकास आराखडा तयार होता. सध्याच्या डीएसआरप्रमाणे आराखड्यासाठी आता सात कोटी रुपयांची गरज आहे. महापालिकेच्या स्वनिधीतून पहिल्या टप्प्यात स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी ७५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
तत्कालीन महापौर प्रतिभा नाईकनवरे यांच्या हस्ते २९ नोव्हेंबर २०१३ ला समाधिस्थळाचे भूमिपूजन झाले. नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांनी ५१ हजार रुपये व महापौरांचे एक महिन्याचे मानधन तसेच नगरसेवक सचिन चव्हाण यांनीही
५१ हजार रुपये समाधीसाठी देण्याचे जाहीर केले. समाधिस्थळ विकसित करण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने स्थायी समिती सभापती आदिल फरास प्रयत्न करीत आहेत.