वेळ गेलेली नाही.. शाहूंनी उमेदवारीचा फेरविचार करावा, हसन मुश्रीफ यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 12:04 PM2024-04-12T12:04:05+5:302024-04-12T12:05:27+5:30
तुम्ही आता एका पक्षाचे झालात
कोल्हापूर : शाहू छत्रपती यांच्याबद्दल आम्हांला आदरच आहे. परंतु ते लोकसभेचे उमेदवार म्हणून एका पक्षाचे झाले. त्यामुळे ते वादात ओढले जाणार हे उघड होते. म्हणूनच मी त्यांनी राजकारणात येऊ नये अशी विनंती केली होती. अजूनही अर्ज भरायला वेळ आहे. त्यांनी उमेदवारीचा फेरविचार करावा, असा सल्ला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे दिला.
भाजपच्या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, संजय मंडलिक यांच्यावर वैयक्तिक टीका करणारे ‘दादा उठा,’ ‘दादा उठा’ यासारखे व्हिडीओ जेव्हा पडायला सुरुवात झाली, तेव्हाच याला उत्तरे दिली जाणार आणि वाद वाढणार, हे आम्हांला माहिती होते. खरोखरच जर शाहू छत्रपतींविषयी प्रेम होते तर त्यांना सन्मानाने राज्यसभा द्यायला हवी होती. संभाजीराजेंनाही खासदार केलेच होते की. त्यामुळे आता या विषयावर पडदा टाकला जावा.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘आमचं ठरलंय,’जनतेचं ठरलंय’ असं म्हणत ह्यांचं जे ठरलेलं असतंय ते जनतेवर लादायचं काम सुरू आहे. अनेक वर्षे आमदार, मंत्री असताना आणि अनेक संस्था ताब्यात असताना कोल्हापूरसाठी यांनी काही केलं नाही. हे अपयश लपवण्यासाठी त्यांचे हे सगळं सुरू असतंय. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील यांची भाषणे झाली.
माझं म्हणणं चुकलं तर माफी मागेन
संजय मंडलिक म्हणाले, मी शाहू छत्रपती यांच्याबद्दल बोलताना ‘थेट’ हा शब्द न वापरण्याची चूक केली. ते थेट वारसदार नाहीत ही वस्तुस्थिती आहे. माझा महाराजांना प्रश्न आहे की तुम्ही दत्तक आहात की नाही, दत्तकची डायरी केली की नाही. हे माझं म्हणणं चुकलं तर मी माफी मागेन.
आमचं ठरलंयचे लचांड
कोल्हापुरात एक नवा गोबेल्स जन्माला आलाय. ‘आमचं ठरलंय’ हे एक नवीन लचांड आम्ही अंगावर घेतलं त्यांच्या उपकाराची परतफेड करण्यातच बराच काळ गेला. त्यांचा पैरा फेडण्यासाठी का असेन ‘दक्षिण’साठी मोठा निधी दिला.
गप्प बसणार नाही
शौमिका महाडिक म्हणाल्या, ही लोकसभेची निवडणूक आहे. दक्षिणमध्ये जर महाडिक-पाटील अशी निवडणूक करण्याचा प्रयत्न झाला तर मीही गप्प बसणार नाही.