शाहू साखर कारखान्याचा साखर उतारा १२.८०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:34 AM2021-06-16T04:34:21+5:302021-06-16T04:34:21+5:30
कागल : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२०-२१ साठीचा सरासरी साखर उतारा १२.८० टक्के ...
कागल : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२०-२१ साठीचा सरासरी साखर उतारा १२.८० टक्के इतका प्रमाणित झालेला आहे. जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये हा उतारा प्रथम क्रमांकाचा आहे, अशी माहिती कारखान्याचे संचालक, माजी मंत्री वीरकुमार पाटील आणि उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, संचालक बाॅबी माने, डी. एस. पाटील, युवराज पाटील, मारुती निगवे, भूपाल पाटील, मारुती पाटील, पी. डी. चौगुले, सचिन मगदूम, बाबूराव पाटील उपस्थित होते. साखर उताऱ्याच्या प्रमाणात एफआरपी रक्कम आकारणी होत असल्याने शाहू साखर कारखान्याचा ऊस दर येणाऱ्या हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक ठरणार आहे. गत हंगामात १२.६० उताऱ्यास २९७० रुपये एफआरपी बसली होती.
अमरसिंह घोरपडे म्हणाले, कारखान्याने २०२०-२१ गळीत हंगामात १० लाख १७ हजार ५४१ मे. टन उसाचे गळीत करून १२ लाख ०३ हजार ८०० क्विंटल साखर पोत्यांची निर्मिती केली आहे. साखर उतारा ११.८३ टक्के व इथेनॉल निर्मितीसाठी ०.९७ टक्के, असा एकूण १२.८० टक्के उतारा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांचेकडून प्रमाणित करण्यात आला आहे.
यशस्वी घोडदौड..
ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील म्हणाले, समरजितसिंह घाटगे यांनी कारखान्याची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांचे नेतृत्वाखाली कारखान्याची घोडदौड यशस्वीपणे चालू असून, कारखान्याच्या इतिहासातील उच्चांकी दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला आहे.
जिल्ह्यातील पहिला कारखाना..
नुकताच झालेल्या गळीत हंगामाच्या पहिल्या दिवसापासून थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीचा जिल्ह्यातील पहिला प्रयोग शाहू साखर कारखान्याने यशस्वीपणे राबविला. तेल कंपन्यांकडून मिळालेला कोठा पूर्ण करीत पासष्ठ लाख लिटर इथेनाॅल उत्पादित केले. त्यामुळे साखरसाठा कमी होण्यास मदत झालीच. शिवाय इथेनॉलचे बिल तातडीने मिळत असलेने कारखान्यास आर्थिक फायदा झाला आहे, अशी माहिती जितेंद्र चव्हाण यांनी दिली.