शाहू मार्केट टेंबलाईवाडीला जोडणार
By admin | Published: January 19, 2016 12:22 AM2016-01-19T00:22:46+5:302016-01-19T00:36:00+5:30
बाजार समिती : माजी संचालकांकडून लवकरात लवकर पैसे वसूल करा : चंद्रकांतदादा
कोल्हापूर : शाहू मार्केट यार्ड व टेंबलाईवाडी येथील नियोजित धान्य मार्केट जोडण्यासाठी रेल्वेरुळावर फाटक अथवा उड्डाणपूल करण्याबाबत रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही सहकार व पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
पाटील यांनी रविवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत आढावा बैठक घेतली. माजी संचालकांवरील जबाबदारी निश्चितीचे काय झाले, असा सवाल करत लवकरात लवकर त्यांच्याकडून पैसे वसूल करा, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. टेंबलाईवाडी मार्केटमध्ये सुविधा नसल्याने धान्य व्यापारी लक्ष्मीपुरी सोडण्यास तयार नसल्याचे नंदकुमार वळंजू व सदानंद कोरगावकर यांनी निदर्शनास आणून दिले. शाहू मार्केटमधून टेंबलाईवाडी मार्केटमध्ये जाण्यासाठी सहा किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. वाहतुकीचा खर्च अंगावर बसत असल्याने व्यापारीही तिथे जाण्यास नाखूश आहेत. यासाठी शाहू मार्केट ते टेंबलाईवाडी मार्केट जोडावे, अशी मागणी वळंजू व कोरगावकर यांनी केली. या दोन मार्केटमध्ये रेल्वे रूळ आहे, तेथून वाहतूक करण्यासाठी एक तर रेल्वे फाटक करायला हवे अन्यथा उड्डाणपूल उभारावे लागेल. उड्डाणपुलाबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलू, पण त्या ऐवजी रेल्वे फाटक केले तर ते अधिक सोयीचे होईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. याबाबत रेल्वेमंत्र्यांशी बोलून मार्ग काढू, असे आश्वासन त्यांनी दिले. २२ माजी संचालकांवर जबाबदारी नोटिसा लागू केल्या असून जानेवारीअखेर पैसे भरण्याचे आदेश दिल्याचे जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी सांगितले. वेळेत पैसे भरले नाही, तर पुढील कारवाई काय करणार, अशी विचारणा मंत्री पाटील यांनी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी महसुली कारवाई करणार असल्याचे काकडे यांनी सांगितले. अस्थापनावर ४५ टक्केपेक्षा जास्त खर्च होत असल्याचे निदर्शनास आणून देत सुरक्षारक्षक समितीचे आहेत की खासगी कंपनीचे अशी विचारणा मंत्री पाटील यांनी केली. इतर समित्यांमध्ये खासगी सुरक्षारक्षक नेमले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. गूळ क्लस्टरसाठी शासन पातळीवर प्रयत्न करणार असून, शेतकऱ्यांच्या हिताचे प्रस्ताव पाठवा, निधी कमी पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्णातील उर्वरित बाजार समित्यांसह सांगली व सातारा जिल्ह्यांतील समित्यांचा आढावा घेतला.
बैठकीला विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे, समितीचे सभापती परशराम खुडे, विलास साठे, विजय नायकल, पणन मंडळाचे अधिकारी, समितीचे संचालक उपस्थित होते.