शाहू जन्मस्थळ अजूनही अपूर्णच

By admin | Published: June 24, 2015 12:31 AM2015-06-24T00:31:13+5:302015-06-24T00:42:07+5:30

तारीख पे तारीख : संग्रहालयासाठी आणखी सहा महिने, यंदाही जयंती अपुऱ्या वास्तूतच होणार

Shahu's birthplace is still unfinished | शाहू जन्मस्थळ अजूनही अपूर्णच

शाहू जन्मस्थळ अजूनही अपूर्णच

Next

इंदुमती गणेश- कोल्हापूर -लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ असलेले कसबा बावड्यातील लक्ष्मी-विलास पॅलेसच्या विकासाचे काम चार वर्षांनंतरही अजून अपूर्णावस्थेतच आहे. जन्मस्थळाचे बांधकाम, नूतनीकरणाची कामे पूर्ण होत आली असली, तरी सुसज्ज वस्तुसंग्रहालय तयार व्हायला किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे यंदाची शाहू जयंतीसुद्धा अपूर्ण वास्तूतच साजरी करावी लागणार आहे. कसबा बावड्यातील लक्ष्मी-विलास पॅलेस या शाहू जन्मस्थळाच्या नूतनीकरणाला आॅगस्ट २०१२ मध्ये सुरुवात झाली. गतवर्षी तत्कालीन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्या वर्षीची शाहू जयंती शाहू जन्मस्थळामध्येच साजरी होईल, अशी घोषणा केली होती. त्यावेळी मुख्य ए, बी, सी व डी या चार इमारती पूर्ण झाल्या होत्या. तेवढ्यावरच समाधान मानत गेल्या वर्षी शाहू जयंती साजरी झाली. आता परिसरातील सर्व इमारती, राधानगरी धरणाच्या प्रतिकृतीचे काम पूर्ण झाले आहे. आजवर या नूतनीकरणासाठी चार कोटी १९ लाख रुपये खर्च झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात येणारे बागकाम, ओपन एअर थिएटर, साठमारीची प्रतिकृती, गार्डनिंग, पॉवर हाउस, कॅँटीन, स्वच्छतागृह या सगळ्यांसाठी राज्य शासनाच्या निधीतून एक कोटी ३६ लाख रुपये या विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत.
भाजपच्या अधिवेशनादरम्यान सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शाहू जन्मस्थळ विकासकामांचा आढावा घेतला होता. त्यात त्यांनी शाहू जन्मस्थळामध्ये सुसज्ज संग्रहालय होण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल, अशी विचारणा केली. त्यावेळी आणखी सहा महिन्यांचा कालावधी मागण्यात आला आहे. त्यामुळे सुसज्ज संग्रहालय पाहण्यासाठी सहा महिने आणि त्याठिकाणी शाहू जयंती साजरी करण्यासाठी एक वर्ष थांबण्याशिवाय गत्यंतर नाही. कृषी विद्यापीठाचा सकारात्मक प्रतिसाद
शाहू जन्मस्थळाला लागूनच कृषी विद्यापीठाची ३० गुंठे जागा आहे. ही जागा शाहू जन्मस्थळाच्या विकासकामांसाठी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. येथे शिल्प गॅलरी करण्याचे नियोजन आहे. या मागणीला कृषी विद्यापीठाच्या सिनेटने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या प्रस्तावाची फाईल राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. मात्र, अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही.


असे का?...
शाहू जन्मस्थळ या संवेदनशील आणि हेरिटेज वास्तूची झालेली अवस्था पाहता नूतनीकरणाचे काम तितक्याच काळजीने होणे ही बाब मान्यच होती; मात्र तब्बल चार वर्षे होत आली, तरी येथे सुसज्ज वस्तुसंग्रहालय उभे राहू शकले नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. त्यानंतर हेरिटेज वास्तू असलेल्या टाउन हॉल संग्रहालयाचे नूतनीकरण होऊन ते खुलेही झाले. केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम अवघ्या दीड वर्षात पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासारखी सुरेख वास्तू उभी राहिली. आता शाहू समाधिस्थळासाठी महापालिकेच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, जन्मस्थळाबाबतीतच अशी दिरंगाई झाली, यामागे अनेक कारणमीमांसा सांगता येतील.


संग्रहालयासाठी साडेसहा कोटींचा प्रस्ताव
परिसरातील इमारती, सुशोभीकरणाचे काम संपल्यानंतर आता शेवटचा टप्पा असणार आहे तो म्हणजे संग्रहालयाचे अंतर्गत काम. यासाठी साडेसहा कोटींचा निधी लागणार असून, सर्व इमारतींमध्ये शाहू महाराजांच्या जन्मापासून ते अखेरपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घटनांवर चित्रे, याशिवाय शिल्पे, शाहू महाराजांनी वापरलेल्या वस्तू, तत्कालीन छायाचित्रे, दुर्मीळ साहित्याचा समावेश असेल. यासाठी संचालकांकडे १० तारखेला साडेसहा कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. तो समितीपुढे मांडला जाईल. त्यात दुरुस्त्या सुचविल्या, तर तसा सुधारित आराखडा राज्य शासनाला सादर होईल. मग प्रस्तावाला मंजुरी मिळेल.


शाहू जन्मस्थळ हे माझ्यासाठीही श्रद्धेचे स्थान आहे. शासनासाठीही हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. इमारतीचे सिव्हिल वर्क संपले आहे. आता फक्त संग्रहालयाचे काम बाकी असून त्यासाठीचा आराखडा तयार आहे. अडचणी नाही आल्या, तर येत्या सहा महिन्यांत सुसज्ज संग्रहालय तयार असेल. फक्त आम्ही करीत असलेल्या कामावर विश्वास ठेवायला हवा.
- अमरजा निंबाळकर, आर्किटेक्ट


शाहू जन्मस्थळाच्या सर्व इमारती, राधानगरी धरणाची प्रतिकृती, अशी कामे पूर्ण झाली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या कामांसाठीही निधी वर्ग झाला आहे. संग्रहालयाचे अंतर्गत काम होणे आता बाकी आहे.
- उत्तम कांबळे, उपअवेक्षक, पुरातत्व विभाग

Web Title: Shahu's birthplace is still unfinished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.