करवीरनगरीत दुमदुमला शाहूंचा जयजयकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 12:41 AM2020-01-20T00:41:03+5:302020-01-20T00:41:14+5:30
कोल्हापूर : लेझीम, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, शाहिरी कार्यक्रम अशा वातावरणामध्ये रविवारी नर्सरी बागेतील लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी ...
कोल्हापूर : लेझीम, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, शाहिरी कार्यक्रम अशा वातावरणामध्ये रविवारी नर्सरी बागेतील लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचा ‘लोकार्पण सोहळा’ दिमाखात झाला. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते कोनशिलेची फीत कापून लोकार्पण करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते.
राजर्षी शाहू महाराज यांनी खुद्द नर्सरी बागेमध्ये समाधी स्मारक करण्याची इच्छा व्यक्त केली होती. महापालिकेने पुढाकार घेऊन येथे भव्य असे ‘समाधी स्मारक’ उभारले. गेल्या तीन दिवसांपासून समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा ‘लोकोत्सव’ म्हणून साजरा केला जात आहे. कलाप्रदर्शन, शाहिरी कार्यक्रम, चित्रप्रदर्शन, हेरीटेज वॉक, ‘शाहू विचार दिंडी’ या माध्यमातून राजर्षी शाहूंचा जागर झाला. यामुळे शहरात शाहूमय वातावरण झाले.
लोकार्पणाच्या मुख्य सोहळ्यासाठी रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून करवीरनगरी नर्सरी बागेत दाखल होत होती. शाहीर रंगराव पाटील यांनी सादर केलेला शाहिरी कार्यक्रम, विद्यार्थ्यांनी लेझीम, शिव-शाहू मर्दानी आखाड्याची खेळांची प्रात्यक्षिके, अशा पारंपरिक कलेमुळे परिसर शाहूमय झाला. सोबतच पोलीस बँडने कार्यक्रमाला वेगळाच थाट निर्माण केला. लोकार्पण सोहळ्यासाठी भगवे, निळे, लाल फेटे घालून नागरिक उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, डॉ. रमेश जाधव, संजय पवार, समाधिस्थळ विकास समितीचे वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँगे्रसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, ठेकेदार व्ही. के. पाटील, आर्किटेक्चर अभिजित जाधव-कसबेकर, संजय माळी यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
अवघी करवीरनगरी समाधिस्थळी
नर्सरी बागेमध्ये शाहू समाधी स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी करवीरनगरीतील नागरिक, शाहूप्रेमी यांनी प्रचंड गर्दी केली होती. समाधी स्मारकासमोर सेल्फी काढण्यासाठीही लोक जमा होत होते.
गर्दी वाढत असल्यामुळे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनाही अखेर नागरिकांना दसरा चौकातील मंडपामध्ये जाण्याचे आवाहन करावे लागले. मुख्य कार्यक्रम झाल्यानंतरही येथे नतमस्तक होण्यासाठी गर्दी कायम होती.
संपूर्ण राजघराणे समाधिस्थळी
शाहू समाधी स्मारक सोहळ्यासाठी संपूर्ण राजघराणे समाधिस्थळी आले होते. यामध्ये शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, युवराज शहाजीराजे, संयोगिता राजे, मधुरिमाराजे यांची उपस्थिती होती.
समाधी स्मारक पाहून शरद पवार भारावले
शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्तेच करायचे, असा निर्धार महापालिकेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यांनीही कार्यक्रमाला हजर राहण्याचा शब्द दिला. यानुसार रविवारी लोकार्पण सोहळ्यासाठी ते समाधिस्थळी आले. नेत्रदीपक असलेले असे शाहूंचे स्मारक पाहून ते भारावून गेले. हे स्मारक शाहूंच्या तोलामोलाचे केल्याचे कौतुकही दसरा चौकातील भाषणातून पवार यांनी केले.