शाहूंचे मूळ छायाचित्र लंडनमधून उपलब्ध - : २६ जूनला पाहण्यासाठी खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:56 PM2019-06-19T23:56:59+5:302019-06-19T23:58:18+5:30
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १९०२ साली लंडनमध्ये काढण्यात आलेल्या राजदरबारी पोशाखातील मूळ छायाचित्राची प्रत व्हिक्टोरिया अॅँड अल्बर्ट म्युझिअम येथून मिळविण्यात पुरातत्त्व विभागाला यश आले आहे.
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १९०२ साली लंडनमध्ये काढण्यात आलेल्या राजदरबारी पोशाखातील मूळ छायाचित्राची प्रत व्हिक्टोरिया अॅँड अल्बर्ट म्युझिअम येथून मिळविण्यात पुरातत्त्व विभागाला यश आले आहे. हे छायाचित्र शाहू जन्मस्थळामधील नियोजित शासकीय संग्रहालयात लावण्यात येणार आहे. शाहू जयंतीच्या दिवशी या छायाचित्राच्या माध्यमातून नागरिकांना शाहू महाराजांचे अस्सल छायाचित्र पाहण्याची संधी मिळणार आहे.
शाहू जन्मस्थळ येथील संग्रहालयात राजर्षी शाहू महाराजांचे मूळ छायाचित्र लावण्यासाठी पुरातत्त्व विभागाने त्यांच्या छायाचित्रांचा शोध सुरू केला. त्यावेळी ब्रिटिश लायब्ररीमध्ये काही छायाचित्रे उपलब्ध असल्याचे समजले.
सदरचे छायाचित्र लंडन येथील व्हिक्टोरिया अॅँड अल्बर्ट म्युझिअम येथील अर्काईव्हजमध्ये संग्रहित असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते मिळविण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली. आॅगस्ट १९०२ मध्ये एडवर्ड सातवे यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी राजर्षी शाहू महाराज लंडनला गेले होते. तिथे त्याकाळी जगभरातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या छायाचित्रणासाठी प्रसिद्ध असलेल्या लफाएत स्टुडिओ येथे जाऊन त्यांनी राजदरबारी पोशाखात छायाचित्रण करून घेतले. कालौघात स्टुडिओ बंद झाल्यानंतर येथील सर्व दुर्मीळ छायाचित्रे व्हिक्टोरिया अॅँड अल्बर्ट म्युझिअमकडे सुपूर्द करण्यात आली. या छायाचित्रांचे हक्क लंडन संग्रहालयाकडे आहेत. त्यांच्या परवानगी शिवाय हे छायाचित्र प्रसिद्ध करता येत नाही. हे छायाचित्र १० वर्षांसाठी प्रदर्शित करण्याचा परवाना दिला जातो.
शाहू जन्मस्थळ येथे साकारण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज संग्रहालयात हे छायाचित्र लावण्यासाठी पुरातत्त्व विभागाने प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन म्युझिअम व्यवस्थापनाने ७५० पौंड (६५ हजार ७७९ रुपये ५० पैसे) इतके शुल्क आकारून या छायाचित्राची प्रत उपलब्ध करून दिली. तत्पूर्वी पुरातत्त्व विभागाकडून या छायाचित्राची केवळ एक प्रत मुद्रित करण्याची व अन्य कोणत्याही ठिकाणी प्रदर्शित अथवा प्रसिद्ध न करण्याची हमी लेखी स्वरूपात देण्यात आली आहे. दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर हे छायाचित्र पुरातत्त्व खात्याला मिळाले असून २६ जूनला शाहू जन्मस्थळ येथे ते मांडण्यात येणार आहे.
या सगळ्या प्रक्रियेसाठी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी तत्काळ मंजुरी दिली. हे छायाचित्र तातडीने उपलब्ध होण्यासाठी लंडन येथील सर्व कार्यवाहीची पूर्तता करण्यासाठी अपर्णा मालाडकर यांचे सहकार्य झाले.
नागरिकांना आवाहन
शाहू जन्मस्थळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय बनविण्यात येणार आहे. त्यासाठी महाराजांच्या संदर्भातील छायाचित्रे, शाहूकालीन वस्तू कोणाच्या संग्रहात असतील तर त्या पुरातत्त्व खात्याकडे द्याव्यात. या मूळ छायाचित्रांचे डिजिटल स्कॅनिंग करून ती छायाचित्रे परत केली जातील. ज्यांच्याकडून अशी छायाचित्रे अथवा वस्तू उपलब्ध होतील, त्यांच्या नावाने या कलाकृतींची नोंदणी विभागाकडे करून तशा आशयाचे प्रमाणपत्र शासनातर्फे त्यांना देण्यात येणार आहे.
तीन चित्रफितीही उपलब्ध
या म्युझियममध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या तीन चित्रफितीही तसेच संस्थानकालीन काही कागदपत्रेही उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. या चित्रफिती व कागदपत्रेही मिळविण्यासाठी पुरातत्त्व विभाग प्रयत्न करीत आहे. त्याला यश आल्यास या चित्रफिती पर्यटकांना दाखविता येतील, अशी माहिती कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाचे अभिरक्षक अमृत पाटील यांनी दिली