शाहूवाडीत वीज वितरण कंपनीचा कारभार चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:18 AM2021-07-16T04:18:00+5:302021-07-16T04:18:00+5:30
राजाराम कांबळे लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील महावितरण कंपनीकडून ग्राहकांना दर्जेदार, वेळेवर सेवा मिळत ...
राजाराम कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील महावितरण कंपनीकडून ग्राहकांना दर्जेदार, वेळेवर सेवा मिळत नाही. ग्राहकांकडे पैशाची मागणी करून पिळवणूक केली जात आहे. वारूळ विभागाचे कनिष्ठ अभियंता मनोज भोरगे हे तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्यामुळे शाहूवाडीतील महावितरण कंपनीच्या उपविभागाचा कारभार उजेडात आला आहे.
महावितरण कंपनीच्या जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून ग्राहकांची होणारी आर्थिक लुटमार थांबवावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
शाहूवाडी तालुका डोंगर, कड्या कपारीत वसला आहे. तालुक्याचे क्षेत्रफळ जास्त आहे. पावणेदोन लाखांवर लोकसंख्या असून ती वाडी वस्तीवर वसली आहे. महावितरण कंपनीचे तालुकाभर घरगुती, कमर्शिअल ग्राहक आहेत. शाहूवाडी, मलकापूर, सरुड, वारूळ, बांबवडे, या ठिकाणी कनिष्ठ दर्जाचे अधिकारी काम करीत असतात. मीटर बदलणे, घरगुती तक्रार, नवीन विद्युत खांब बसवणे, डीपी किंवा ट्रान्सफाॅर्मर बसवणे, नवीन वीज कनेक्शन देणे, आदी कामे महावितरण कंपनी स्वत: किंवा ठेकेदाराकडून करून घेते. मात्र, महावितरण कंपनीचे काही कनिष्ठ दर्जाचे अधिकारी, कर्मचारी ग्राहकांची कामे वेळेवर करून देत नाहीत. ग्राहकांना हेलपाटे मारायला लावले जातात. अधिकारी आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्याकरवी पैशांची मागणी केली जाते. मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत काम केले जात नाही. तालुक्याच्या अधिकाऱ्याकडे तक्रार करून देखील ग्राहकांची दखल घेतली जात नाही. मुख्य कार्यालयात ग्राहकांच्या प्रश्नांना उद्धट उत्तरे दिली जातात. कार्यालयात कामासाठी येणाऱ्या ग्राहकाला आपण येथे येऊन चूक केली, असे वाटते. ग्राहकांनी बिल थकविल्यास नोटीस न देता ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडले जाते. वरिष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता काही अधिकाऱ्यांनी लाखो रुपये घेऊन ट्रान्सफाॅर्मर बसवले आहेत. शाहूवाडीत जमिनीला मोठा भाव आल्यामुळे येथे अनेक गर्भश्रीमंतांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. रिसॉर्ट, हॉटेल, बंगले, प्लॉट पाडण्यासाठी महावितरण कंपनीची लाइटची गरज असते. लाखो रुपये लाच घेऊन पंधरा दिवसांत ट्रान्सफाॅर्मर बसवून लाइट जोडली जाते. सर्वसामान्य मात्र पैसे नसल्यामुळे वर्षभर हेलपाटे मारत असतो. आर्थिक व्यवहार करणाऱ्याचे काम अगोदर केले जाते. कुंपणच शेत खात असेल तर ग्राहकांनी न्याय कुणाकडे मागायचा, अशी परिस्थिती आहे.
ठेकेदाराकडून ग्राहकांची लूट
महावितरण कंपनीकडून नेमलेले ठेकेदारदेखील अधिकाऱ्यांशी संगनमत करून ग्राहकांना वेठीस धरून आर्थिक व्यवहार केला जातो. वेळेवर ग्राहकांची कामे केली जात नाहीत. अशा ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.