शाहूवाडी तालुक्यात शेतीचे भाव गगनाला भिडले
By admin | Published: October 23, 2014 10:22 PM2014-10-23T22:22:47+5:302014-10-23T22:50:20+5:30
जमिनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक : कर्मचारीवर्गाचा शेती खरेदी करण्याकडे कल
सरूड : वर्षभर राबराब-राबूनही कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे शेतीच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना जमत नाही़ शेती व्यवसाय करणे म्हणजे वर्षाकाठी डोक्यावर कर्ज करून घेणे ही व्याख्या आता शेतकऱ्यांत रूढ झाली आहे़, असे असताना व्यापारी, डॉक्टर मंडळी व अधिकाऱ्यांनी शेतीची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढीव दराने करणे सुरू केल्याने शाहूवाडी तालुक्यात शेतीचे भाव गगनाला भिडले आहेत़
वडिलोपार्जित जमीन आहे आणि स्वत:ला नोकरी नाही अथवा कोणता व्यवसाय नाही म्हणून काही तरी करावे लागते, म्हणून शेती करणाऱ्यांंची संख्या अधिक आहे़ खरीप हंगाम उजाडताच पावसाळ्यात पेरणीसाठी वेळेवर खते मिळत नाहीत म्हणून महिन्याआधीच खते खरेदी करण्यासाठी बाजारात चकरा माराव्या लागतात़ खते व बियाणे खरेदी करण्यापासून शेतकऱ्यांना अडते, व्यापारी, बँका व सावकाराकडून दरवर्षी व्याजाने पैसे घ्यावे लागतात़. खते, बियाणे खरेदी व शेतीवर वर्षभर करावा लागणारा खर्च, सालगड्याचा खर्च वजा जाता शेतकरी शेतीच्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवू शकत नाही़, अशी भयावह व सत्य परिस्थिती शेतकऱ्यांची आहे़ शेतीसाठी लागणारा प्रचंड खर्च व त्या मानाने मिळणारा नाममात्र भाव यामुळे धानविक्री करून सगळे देणे झाल्यानंतर वर्षभर सुखाने जीवन जगू शकेल इतका पैसादेखील शेतकऱ्यांंजवळ राहत नाही, यामुळे शेतकरीवर्ग शेतीला कंटाळला आहे.
अधिकारी वर्ग, डॉक्टर, अभियंता व मोठे व्यापारी महिन्याला लाखो रूपये कमवितात. यातील ८० टक्के रक्कम बचत होते. या रकमेला बँकेमध्ये अत्यंत कमी व्याजदर मिळतो. इतर उद्योगांमध्ये गुंतवणूक केल्यास त्यावर स्वतंत्र लक्ष ठेवावे लागते. मात्र, एवढा वेळ या मंडळींकडे नाही. त्यामुळे या मंडळींचा जमीन खरेदी करण्याकडे कल असल्याचे दिसून येते. जमिनीमधून खर्चाएवढेही उत्पादन होत नसले तरी जमिनीच्या किमती मात्र दरवर्षी वाढत चालल्या आहेत व भविष्यातही त्यामध्ये वाढ होणार आहे. ही बाब या मंडळींना चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे.
त्याचबरोबर घेतलेली जमीन पडीत असली तरी शेतीमधून उत्पन्न दाखवून इन्कम टॅक्स वाचविला जातो. भविष्यात मुलाला नोकरी न मिळाल्यास शेवटचा पर्याय म्हणूनदेखील शेती केली जाते. त्यामुळे शेती हा घाट्याचा व्यवसाय असूनसुद्धा जमिनीच्या किमती इतर वस्तूंपेक्षा वेगाने वाढत आहेत. (वार्ताहर)
भू-माफियांच्या मगरमिठीत अडकला शेतकरी
रस्त्यालगतच्या शेतीला अवाजवी भाव देऊन भू-माफिया शेती शेतकऱ्यांकडून स्वत:च्या ताब्यात घेत आहेत. हा शेतीचा व्यवहार फक्त एका करारनाम्यावर केला जातो़ त्या जागेचा अकृषक करण्यासाठी प्रस्ताव पाठविला जातो़ सरकारी बाबूंना पैशाचे आमिष दाखवून अवैधरीत्या शेतीचे प्लॉटमध्ये रूपांतर केले जाते. हा प्लॉट विक्रीसाठी बुकिंगच्या नावाने काढला जातो़ या सर्व खेळात शेतकऱ्याला पडद्यामागे ठेवले जात आहे. केवळ रजिस्टरच्या वेळी शेतकऱ्यांना समोरो केले जाते़ शेतकऱ्यांच्या हातावर थोडीशी रक्कम ठेवून त्याला मोकळे केले जाते. त्यानंतर प्लॉट पाडून कोट्यवधी रुपये कमाविण्याचा रोजगार सुरू झाला आहे.