शाहूवाडी तालुक्यात गुऱ्हाळघरांची धुराडी पेटली
By admin | Published: November 5, 2015 11:24 PM2015-11-05T23:24:53+5:302015-11-05T23:48:14+5:30
संख्येत प्रतिवर्षी घट : गूळ उत्पादक शेतकऱ्यांची दरावर नजर; दरकपात झाल्यास व्यवसाय धोक्यात येणार
संजय पाटील-- सरुड-शाहूवाडी तालुक्यात वारणा नदीच्या पट्ट्यात गुऱ्हाळघरांच्या गाळपाला प्रारंभ झाला आहे, तर गूळ उत्पादक शेतकऱ्यांची दरावर नजर आहे. हंगामात गुळाचा दर सरासरी चार हजार रुपयांच्या दरम्यान असावा. जर गूळ दरात व्यापाऱ्यांनी कपात केली, तर मात्र भविष्यात हा व्यवसाय धोक्यात येण्याची चिन्हे असल्याचे जाणकार व्यक्त करीत आहेत.
शाहूवाडी तालुक्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीस गुऱ्हाळघरांची धुराडी पेटते. या गुऱ्हाळघरामुळे किमान चार ते पाच महिने अनेकांना हक्काचा रोजगार मिळतो. यावर अनेकांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. तालुक्यात यापूर्वी सुमारे दोनशेच्या पुढे गुऱ्हाळघरे होती; परंतु गुळाचा दर, कामगार कमतरता यांच्यामुळे गुऱ्हाळघरांच्या संख्येत प्रतिवर्षी घट होत असल्याचे दिसत आहे.
गुऱ्हाळाचा गळीत हंगाम सुरू झाला असला तरी यासाठी लागणारे मजूर मिळविणे व ते टिकवून ठेवणे तसेच गुऱ्हाळावर गाळपास येणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. सध्या साखर कारखान्यांच्या दरावर गुऱ्हाळघरांचे भवितव्य अवलंबून आहे. कारण गुळाला कमी भाव जर मिळाला तर उत्पादन खर्च निघत नाही. त्यामुळे जिकडे दर तिकडे ऊस अशी स्थिती निर्माण झाल्यास गुऱ्हाळमालकांना उद्योग चालविणे अवघड जाते. गुळाला उत्पादन खर्चावर व ठरावीक रकमेपेक्षा जास्त दर जर ठरविला तरच गुऱ्हाळघरे सुरू राहतील, अन्यथा येत्या एक-दोन वर्षांत हा उद्योग पूर्ण संपण्याच्या मार्गावर जाणार असल्याचे जाणकार गूळ उत्पादकांतून बोलले जात आहे.
गुऱ्हाळघरासाठी लागणाऱ्या मजुरांची कमतरता ही मोठी समस्या आहे. उत्पादन कमी व खर्च जास्त त्या तुलनेत मिळणारा दर कमी आहे. आवक जास्त झाली की व्यापारी दर पाडतात. साखर कारखान्यांचा दर व गूळ दर यांच्यातील फरक दहा टक्के गुळाला चांगला दर मिळतो, तर नव्वद टक्के गुळाला कमी दर मिळतो. त्यामुळे सरासरी दर मिळत नाही. शासनाने या व्यवसायाकडे लक्ष दिले नाही तर हा व्यवसाय पूर्ण बंद होईल.
- मानसिंग पाटील, गुऱ्हाळघर मालक, सरूड.