शिरोली दुमालातील ‘शेलारमामा’ दत्तू पाटील --सात दशके मर्दानी खेळ ठेवलाय जागता : शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 08:46 PM2018-06-06T20:46:57+5:302018-06-06T20:46:57+5:30
‘रायगडाच्या पयल्या पायरीवर पाय ठेवला की कधी एकदा गडावर पोचून तिथली माती कपाळावर माखून मर्दानी ख्योळ दाखवीन असं हुतंया..’ ८७ वर्षीय ‘शेलारमामां’चे हे बोल तरुणाईच्या अंगात दहा हत्तीचं बळ आणतात.
भरत बुटाले ।
कोल्हापूर : ‘रायगडाच्या पयल्या पायरीवर पाय ठेवला की कधी एकदा गडावर पोचून तिथली माती कपाळावर माखून मर्दानी ख्योळ दाखवीन असं हुतंया..’ ८७ वर्षीय ‘शेलारमामां’चे हे बोल तरुणाईच्या अंगात दहा हत्तीचं बळ आणतात.
शिवराज्याभिषेक दिनी गेली आठ वर्षे रायगड पायी चढणाऱ्या शिरोली दुमाला येथील दत्तू पाटील व मर्दानी खेळ यांचं नातं गेल्या सात दशकांचं आहे. ‘शेलारमामा’ ही पदवी त्यांना रायगडाच्या साक्षीनेच १९८०मध्ये जनसमुदायाने बहाल केली आहे.
पैलवानाला जशी लाल माती खुणावतेय, तशी पाटील यांना मर्दानी खेळाची शस्त्रं खुणावतात. मावळ्याची वेशभूषा परिधान करून खेळाचं प्रात्यक्षिक सादर करताना त्यांच्यातील चपळाई अनुभवता येते.
दांडपट्टा फिरविणे असो, दांडपट्ट्याने लिंबू कापणे, लाठी-काठी फिरविणे, तलवारबाजी, पेटती समई डोक्यावर ठेवून समतोल साधत दोन्ही हातांत कारली घेऊन चौफेर फिरविणे, इट्यांनी १२ फुटांवरचं लक्ष्य अचूक टिपणं, दोरीला बांधलेली वीट फेकून ती परत हातात घेणं, दंड फळी, एकमोरी फळीवर संतुलन साधणं, भालाफेक, आदी कलांमध्ये ते माहीर आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना वयाच्या १६व्या वर्षी पाटील यांच्यासह १० ते १२ जणांनी गोपाळ पाटील यांच्याकडून मर्दानी खेळाचे धडे घेतले. तो काळ ग्रामीण जनतेसाठी कसोटीची होता. काबाडकष्ट, हलाखीची परिस्थिती, शिक्षणाचा तर पत्ताच नाही, काळं हुलगं, नाचण्याच्या भाकरीबरोबर भिजवलेलं हिरवं उडीद खाऊन जगलेली ही माणसं. तेही पुरेसं नाही. तरीही इच्छाशक्ती, जिद्द आणि प्रामाणिक सराव ही बलस्थानं त्यांच्यातली रग कायम टिकवून आहे.
सडपातळ बांधा, भारदार मिशा, अंगात तीन बटणी शर्ट, विजार, खांद्यावर टॉवेल असं व्यक्तिमत्त्व असलेले दत्तू पाटील शेतात कुटुंबासह काबाडकष्ट करतात. खासदार संभाजीराजे यांच्या आग्रहास्तव २००९ पासून ते शिवराज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर जातात. तेथे त्यांच्या मर्दानी खेळाचा थरार अनुभवयास मिळतो.
मर्दानी खेळाची जवळजवळ सर्वच शस्त्रं पाटील यांच्याकडे आहेत. त्याद्वारे त्यांनी शिरोलीतील १००वर युवक-युवतींना मर्दानी खेळ शिकविला आहे. असा हा अवलिया यावर्षीही मर्दानी खेळाचा थरार दाखविण्यासाठी शिवराज्याभिषेक दिनाच्या आदल्या दिवशीच पोहोचला आहे.
मर्दानी खेळाचे साहित्य
दांडपट्टा, तलवारी, ढाल, इट्या, भाला, समई, लाठी-काठी, इच्या, काठी बंदाटी, जोडी बंदाटी, डबल दंड अशी अनेक प्रकारची शिवकालीन शस्त्रं दत्तात्रय पाटील यांच्या घरी पाहावयास मिळतात.
खासदार संभाजीराजांमुळंच मला माझ्यातला मर्दानी खेळ मुंबई, दिल्लीपर्यंत दाखवायला मिळाला. आताच्या पोरांनीही मर्दानी खेळ शिकून शिवाजी महाराजांचं नाव जागवत ठेवायला पाहिजे.
- दत्तात्रय पाटील