शाजी करुण यांना ‘बाबूराव पेंटर’ पुरस्कार
By admin | Published: December 23, 2016 01:13 AM2016-12-23T01:13:39+5:302016-12-23T01:13:39+5:30
‘किफ्फ’चा पडदा उघडला...! : ‘अंडर कन्स्ट्रक्शन’ चित्रपटाने प्रारंभ; पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन
कोल्हापूर : जगभरातील चित्रपटांकडे पाहण्याची खिडकी उपलब्ध करून देत, विविध भाषांतील सुमारे ५० हून अधिक चित्रपट, तितक्याच लघुपटांचा समावेश असलेल्या पाचव्या कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (किफ्फ)चा पडदा गुरुवारी उघडला. ‘अंडर कन्स्ट्रक्शन’ या बांग्लादेशी चित्रपटाने महोत्सवास प्रारंभ झाला.
कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीतर्फे राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ मल्याळम दिग्दर्शक शाजी करुण यांना ‘कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
कुलपती डॉ. पाटील म्हणाले, साहित्य आणि चित्रपट यांचा जवळचा संबंध असतो. सिनेमा मानवी जीवनाचे प्रतिबिंब असतो. त्यातील चांगल्या गोष्टी घेतल्यास आयुष्याला दिशा मिळते. शंभर वर्षांपूर्वी बाबूराव पेंटर यांनी चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या योगदानामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे. दिग्दर्शक करुण म्हणाले, भारतीय चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कोल्हापूर शहरात सन्मान होणे हा माझ्यासाठी महत्त्वाचा क्षण आहे. भारतीय सिनेमासाठी मराठी चित्रपट आजही नवनवीन आशय, संकल्पना हाताळत असून त्यांचेही योगदान मोलाचे ठरते आहे. जगभरातील चित्रपट चळवळीसाठी काम करणाऱ्या बर्लिन, कॅम, लकॉर्ना, आदी महोत्सवांसारखाच ‘किफ्फ’देखील महत्त्वाचा चित्रपट महोत्सव ठरेल. समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी प्रास्ताविक केले. दिलीप बापट यांनी मानपत्राचे वाचन केले.
‘७० साल आझादी
याद करो कुर्बानी’
राजर्षी शाहू स्मारक भवन येथील कलादालनात केंद्र सरकारच्या ‘७० साल आझादी - याद करो कुर्बानी’ या संकल्पनेअंतर्गत पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व्ही. डी. माने यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात १८५७, एक कदम, ब्रिटिश सरकार, मंगल मांडे - द रायझिंग, हमारा वतन, हकिकत, हिंदुस्थान की कसम, जुनून, सरदार, वीर सावरकर, सिकंदर, जय स्वदेश, बोस - द फरगॉटन हिरो, आदी निवडक चित्रपटांच्या पोस्टरांचा समावेश आहे.
आजचे चित्रपट :
स्क्रीन १ : सकाळी १० वा.- एआयएन (मल्याळम), दुपारी १२ वा.- ए क्युब आॅफ शुगर (इराण), दुपारी २.३० वा.- द हंट (डेन्मार्क), सायंकाळी ६.३० वा.- माचीवरचा बुद्धा (मराठी), रात्री ९ वा.- वलिया चिरकुल्ला पक्षीकाल (मल्याळम).
स्क्रीन २ : सकाळी १० वा.- ए क्लॉकवर्क आॅरेंज (यूके), दुपारी १२ वा.- जलाल्स स्टोरी (बांग्लादेश), दुपारी २.३० वा. - २००१ : अ स्पेस ओडिसी (युके), सायंकाळी ६.३० वा. - द पेंटिंग पूल (इराण), रात्री ९ वा.- कुट्टी सरांक (मल्याळम).
स्क्रीन ३ : सकाळी १० वा.- हरिकथा प्रसंग (कन्नड), दुपारी १२ वा.- कादंबरी (बंगाली), सायंकाळी ६.३० वा.- गांधी (इंग्रजी).
आजचे लघुपट :
स्क्र ीन ३ : दुपारी २.३० वा. : जिप्सी (१० मि.), औषध (१८ मि.), संवादिनी साधक : पं. तुळशीदास बोरकर (७२ मि.)., आफ्टरग्लो ( २० मि.). सायंकाळी ६.३० वा : अगली बार / अॅँड देन दे केम आफ्टर मी ( ७ मि.), सोलो फिनाले (९ मि.), छाया (१० मि.), प्लेसीबो (९६ मि.)