इतिहासाच्या विषारीकरणामुळेच शंभुराजांची बदनामी : आनंद पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:40 AM2018-10-15T11:40:07+5:302018-10-15T11:50:25+5:30
इतिहासाचे विषारीकरण झाले असून ते ओळखणारा येथे कोणीच नाही; त्यामुळेच छत्रपती शंभुराजे यांच्या बदनामीसारखे प्रकार वारंवार घडत आहेत. यासाठी हे विषारीकरण ओळखले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद पाटील यांनी रविवारी येथे केले.
कोल्हापूर : इतिहासाचे विषारीकरण झाले असून ते ओळखणारा येथे कोणीच नाही; त्यामुळेच छत्रपती शंभुराजे यांच्या बदनामीसारखे प्रकार वारंवार घडत आहेत. यासाठी हे विषारीकरण ओळखले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद पाटील यांनी रविवारी येथे केले.
शाहू स्मारक भवनात मराठा महासंघातर्फे आयोजित शंभुराजे सन्मान परिषदेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे, डॉ. विलास पोवार, ज्येष्ठ पत्रकार पी. बी. पोवार, मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, इस्माईल पठाण, गणी आजरेकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
परिषदेमध्ये शंभुराजेंची प्रतिमा मलिन करणाऱ्या लेखिका डॉ. शुभा साठे यांच्यासह सरकारबद्दल मान्यवरांनी यावेळी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी इंद्रजित माने यांनी मांडलेल्या ठरावांना हात उंचावून मंजुरी देण्यात आली.
आनंद पाटील म्हणाले, आपला इतिहास जवळच आहे; परंतु तो आपल्याला दिसत नाही. आपण याबाबत अभ्यास करीत नाही. कुठला तरी जुना कागद शोधायचा आणि त्याचे भाषांतर करायचे या पलीकडे आपण जात नाही. येथील इतिहासाचे पुरावे नष्ट करण्यात आले असून, खऱ्या इतिहासाचे संशोधन हे परदेशातच होत आहे.
डॉ. मोरे म्हणाले, छत्रपती शिवाजी व शंभुराजे यांची बदनामी ही राज्याभिषेक दिन सोहळ्यापासून आजपर्यंत सुरूच आहे. ती पुस्तकापुरती मर्यादित नसून ‘राजसंन्यास,’ ‘बेबंदशाही’ अशा नाटकांमधूनही सुरू आहे. त्यामुळे या नाटकांवरही बंदी घातली पाहिजे.
इंद्रजित सावंत म्हणाले, जोपर्यंत हे सरकार बदलत नाही, तोपर्यंत बदनामीचे षड्यंत्र सुरूच राहणार आहे; त्यामुळे नुसती ही परिषद घेऊन न थांबता या पुस्तकांची सरकार जाहीर होळी करीत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबविणार नाही.
विलास पोवार म्हणाले, इतिहासाचे पुनर्संशोधन होऊनही बदनामी सुरूच आहे. पी. बी. पोवार म्हणाले, आपल्यातील उणिवांमुळे व दुर्लक्षामुळे असे प्रकार होत आहेत. पठाण म्हणाले, कोणतेही पुरावे नसताना शंभुराजेंच्या बदनामीचा मजकूर छापण्याचा प्रकार निषेधार्ह आहे. मुळीक यांनी शंभुराजेंची बदनामी सहन केली जाणार नाही, असा इशारा देत संबंधितांना त्याच भाषेत उत्तर देऊ, असे सांगितले. बबन रानगे यांनी स्वागत केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन व शिरीष जाधव यांनी आभार मानले.