कोल्हापुरात जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शौमिका महाडिक, उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सर्जेराव पाटील

By admin | Published: March 21, 2017 11:51 AM2017-03-21T11:51:39+5:302017-03-21T11:51:39+5:30

काँग्रेसचे दोन सदस्य अनुपस्थित राहण्याची शक्यता : सतेज पाटील, मुश्रीफसोबत पी. एन यांच्यात वाद

Shamika Mahadik as president of district council in Kolhapur, Sarjerao Patil of Shiv Sena as vice president | कोल्हापुरात जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शौमिका महाडिक, उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सर्जेराव पाटील

कोल्हापुरात जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शौमिका महाडिक, उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सर्जेराव पाटील

Next



आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड आज दुपारी होणार असून भाजपकडून माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका आणि उपाध्यक्षपदासाठी जिल्हा बँकेचे माजी संचालक सर्जेराव पाटील यांची नावे जाहीर झाली आहेत. जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी आता भाजप, शिवसेना आणि काही आघाड्या एकत्र आल्या आहेत.


काँग्रेसकडून माजी आमदार पी. एन. पाटील यांचा मुलगा राहुल यांचे नावे जाहीर झाले होते,पण रात्रीतून नव्या घडामोडी घडल्यामुळे काँग्रेसने आता अध्यक्षपदासाठी बंडा माने तर उपाध्यक्षपदासाठी जयवंतराव शिंपी यांची नावे जाहीर केली आहेत. यामुळे मंगळवारी सकाळीच काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासोबत माजी आमदार पी. एन. पाटील यांची वादावादी झाली. आपली फसवणुक केल्याचा आरोप त्यांनी या आमदारांवर केला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सुरु असलेली राजकीय पक्षांची चढाओढ मंगळवारी सकाळीही कायम होती.

ताज्या घडामोडीनुसार कोणत्याही परिस्थितीत भाजता आघाडीशी हातमिळविणी करणार नाही, आणि काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी व्हीप काढणाऱ्या शिवसेनेने अचानक युटर्न घेत पक्ष अध्यक्षपदाची निवडणुक लढविणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे शाहूवाडीचे आमदार सत्यजित पाटील यांनीही आज सकाळी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजता आघाडीचे संख्याबळ वाढले आहे. यामुळे जिल्हा परिषदेत अध्यक्ष भाजपचा आणि उपाध्यक्ष शिवसेनेचा अशी नवी तडजोड झाली आहे. यामुळे उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटाचे जिल्हा बँकेचे माजी संचालक सर्जेराव पाटील यांचे नाव नक्की करण्यात आले आहे. तशा सूचना हॉटेल अयोध्या येथे सकाळी झालेल्या बैठकीत सर्व नूतन जिल्हा परिषद सदस्यांना देण्यात आल्यानंतर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर बेळगावकडे रवाना झाले.


अतिशय वेगाने घडलेल्या घडामोडीनंतर भाजता आघाडीकडे ३७ सदस्यांचे संख्याबळ झाल्याने हे सर्व सदस्य माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या बंगल्यात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवार शौमिका महाडिक, आमदार डॉ. सुजीत मिणचेकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, हिंदुराव शेळके, राहुल आवाडे, जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे उपस्थित होते.


दरम्यान, काँग्रेसच्या गोटात मोठा बदल झाला आहे. माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी आपली भूमिका कायम ठेवत पी. एन. पाटील यांचा मुलगा राहुल यांना विरोध केल्यामुळे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी सकाळी अध्यक्षपदासाठी बंडा माने आणि उपाध्यक्षपदासाठी जयवंतराव शिंपी यांची नावे जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या पी. एन. पाटील यांची सकाळी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याबरोबर वादावादी झाली. दोघांनीही आपली फसवणुक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. बजरंग देसाई आणि मानसिंगराव गायकवाड गटाचे दोन सदस्य निवडणुकप्रसंगी अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेसचे संख्याबळ यावेळी कमी असण्याची शक्यता आहे.

Web Title: Shamika Mahadik as president of district council in Kolhapur, Sarjerao Patil of Shiv Sena as vice president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.