शौमिका महाडिक, राजू मगदूम यांच्यात खडाजंगी; कोल्हापूर जिल्हा परिषद दणाणली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:56 AM2018-12-22T00:56:36+5:302018-12-22T00:56:41+5:30

कोल्हापूर : यशवंत ग्राम पुरस्कार निवडीचे निमित्त होऊन जिल्हा परिषदेत शुक्रवारी अध्यक्षा शौमिका महाडिक व माणगावचे उपसरपंच व महिला ...

Shamika Mahadik, Raju Magadum; Kolhapur Zilla Parishad survey | शौमिका महाडिक, राजू मगदूम यांच्यात खडाजंगी; कोल्हापूर जिल्हा परिषद दणाणली

शौमिका महाडिक, राजू मगदूम यांच्यात खडाजंगी; कोल्हापूर जिल्हा परिषद दणाणली

googlenewsNext

कोल्हापूर : यशवंत ग्राम पुरस्कार निवडीचे निमित्त होऊन जिल्हा परिषदेत शुक्रवारी अध्यक्षा शौमिका महाडिक व माणगावचे उपसरपंच व महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वंदना मगदूम यांचे दीर राजू मगदूम यांच्यात जोरदार वादावादी झाली. पंधरा मिनिटांहून अधिक काळ चाललेल्या शाब्दिक खडाजंगीने अध्यक्षांच्या अ‍ॅँटीचेंबरसह जिल्हा परिषद दणाणली. अखेर बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर व गटनेते अरुण इंगवले यांनी मध्यस्थी करीत वाद मिटविल्याने प्रकरण शांत झाले. मगदूम या आवाडे गटाचे सदस्य आहेत.
यशवंत ग्राम पुरस्कारासाठी गावांची निवड करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आजरा तालुक्यातील हत्तीवडे आणि हातकणंगलेतील माणगाव या दोन गावांना समान गुण मिळाल्याने पुरस्कार निवडीचा गुंता निर्माण झाला आहे. यावर जिल्हा परिषदेत धुसफूस सुरू आहे. शुक्रवारी सकाळी या संदर्भात अध्यक्षा महाडिक यांनी माणगावचे उपसरपंच मगदूम यांना बैठकीसाठी बोलावले; पण स्वत: त्याच कार्यालयात उपस्थित नसल्याने बैठक होऊ शकली नाही. अखेर दुपारी सव्वाचारच्या सुमारास पुन्हा एकदा मगदूम यांना बोलावले. अध्यक्षांच्या अ‍ॅँटीचेंबरमध्ये बैठक सुरू होती. यावेळी त्यांच्यासोबत राहुल आवाडे हेही उपस्थित होते. मगदूम यांनी ‘तुम्ही पाच गुण वाढवून देतो असे म्हटला होता, त्याचे काय झाले?’ अशी विचारणा केली, ‘हत्तीवडे गावाची लोकसंख्या एक हजार आहे, आमच्या गावची १६ हजार आहे. आम्हाला डावलले तर आम्ही सगळा गाव जिल्हा परिषदेत आणू,’ असे त्यांनी सांगितले. यावर भडकलेल्या महाडिक यांनी ‘राजू मगदूम, तुम्ही पेपरबाजी करता; मी खपवून घेणार नाही,’ असे सुनावले.
यावर मगदूम यांनीही ‘आवाज वाढवून बोलायचे नाही; तुम्ही आमच्या मालक नाही. हळू आवाजात बोलायचे,’ असे सांगताच दोघांमध्ये जोरदार वादाला सुरुवात झाली. ‘लहानसहान गोष्टींत राजकारण करताय; निदान मोठे तरी करा,’ असे महाडिक यांनी सुनावले. याला मगदूम यांनीही ‘आम्ही लहानच राजकारण करणार; तुम्ही मोठे करा,’ असे सांगत जोरदार प्रत्युत्तर दिले. एकेरीवर आलेला वाद हातघाईवर येणार म्हटल्यावर बांधकाम सभापती पेरीडकर व इंगवले यांनी हस्तक्षेत करीत दोघांनाही शांत केले. वाद मिटला तरी यावरून जिल्हा परिषदेचे वातावरण चांगलेच तापले होते.

इशारे काय देता..सत्तेतून बाहेर पडा : महाडिक
हा वाद सुरू असतानाच सदस्य राहुल आवाडे यांनी हस्तक्षेप करीत ‘अध्यक्षांप्रमाणे वागा,’ असे म्हणताच भडकलेल्या महाडिक यांनी ‘सारखा-सारखा इशारा काय देता? सत्तेतून बाहेर पडा!’ असे सुनावले. यावर मगदूम यांंनी, तुम्हाला सांगूनच बाहेर पडतो. तुम्ही करवीरच्या सभापतींचा राजीनामा काही तासांत मंजूर केला; महिला बालकल्याण सभापतींचा राजीनामा मंजूर करण्यासाठी दहा दिवस घालवल्याची आठवण करून दिली. यावरून दोघांमध्ये वाद झाला.
सत्ताधाऱ्यांमध्येच धुमशान
सत्ताधाºयांमध्येच वाद होण्याची जिल्हा परिषदेतील गेल्या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. चार दिवसांपूर्वी समाजकल्याण सभापती विशांत महापुरे व सदस्य राहुल आवाडे यांच्यात सायकल वाटपावरून वादावादी झाली. यापूर्वी सर्वसाधारण सभेतही असाच वाद झाला होता. आता सत्ताधारी अध्यक्ष व महिला बालकल्याणच्या सभापतीचे पती यांच्यात झालेल्या वादाने संघर्ष कोणत्या टोकावर पोहोचलाय, याची झलक दिसत आहे.
आकांडतांडव करणे चुकीचे : महाडिक
निकाल जाहीर करण्यापूर्वी आकांडतांडव करणे चुकीचे आहे. अध्यक्ष म्हणून माझा या निर्णय प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप नाही. राजू मगदूम हे अधिकाºयांवर दबाब आणतात. गैरसमज पसरवतात. यापूर्वीही त्यांनी दोन वेळा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे, म्हणून त्यांना सुनावले. मी कधीही सावत्रपणाची भूमिका घेतलेली नाही, असे महाडिक यांनी सांगितले.
अध्यक्षांनी पदाला शोभेल असे वागावे : आवाडे
अध्यक्षा महाडिक यांनी पदाला शोभेल असे समजूतदारपणे आणि जबाबदारीने वागणे अपेक्षित होते; पण याऐवजी त्या एकेरीवर येऊन सदस्यांशी बोलतात. दादागिरीची भाषा करणे त्यांच्या पदाला शोभणारे नाही. नेत्यांच्या कानांवर या गोष्टी घातल्या जाणार आहेत असे सदस्य राहूल आवाडे यांनी सांगितले.
न्यायासाठीच भांडलो : मगदूम
माझ्या गावाची लोकसंख्या जास्त असतानाही जाणीवपूर्वक डावलले जात असल्याबद्दल अध्यक्षांकडे रीतसर तक्रार केली. स्वत: अध्यक्षांनीच केबिनमध्ये बोलावल्यामुळे गेलो असताना तेथे चर्चेऐवजी आमच्यावरच पेपरबाजी करीत असल्याचा आरोप करीत त्या जाब विचारतात, हे योग्य नाही. न्यायासाठी भांडलो आणि यापुढेही भांडत राहणार असल्याचे माणगांवचे उपसरपंच राजू मगदूम यांनी सांगितले.

Web Title: Shamika Mahadik, Raju Magadum; Kolhapur Zilla Parishad survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.