नऊ गुंठ्यांसाठी शामरावचा घात

By Admin | Published: August 1, 2016 12:47 AM2016-08-01T00:47:24+5:302016-08-01T00:47:24+5:30

पत्नीच बनली वैरी : बेवारशांना आधार देणाऱ्या वारकऱ्यावर ‘बेवारस’ अंत्यसंस्कार

Shamrao raid for nine gunthas | नऊ गुंठ्यांसाठी शामरावचा घात

नऊ गुंठ्यांसाठी शामरावचा घात

googlenewsNext

एकनाथ पाटील / कोल्हापूर
ज्याला कोणी नाही, त्याला मदतीचा हात देणे, बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नेहमी पुढाकार घेणारे पंढरीचे वारकरी शामराव पांडुरंग फडतरे (वय ४०, रा. पाचगाव, ता. करवीर) यांचा खून नऊ गुंठे जमिनीसाठी झाला. ही जमीन नावावर करून देण्यास नकार दिल्याने पत्नीनेच त्यांचा घात केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. या घटनेने पाचगाव परिसर हादरून गेला आहे.
पंधरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शामराव फडतरे यांचा खून झाल्याचे उघड होताच जिल्ह्णात खळबळ उडाली. तासगाव पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला. शामराव फडतरे दारूच्या नशेत पत्नी सुमन फडतरे हिचा छळ करीत होते. या छळाला कंटाळून तिने बहिणीचा मुलगा रणजित पाटील व त्याच्या साथीदाराच्या मदतीने त्यांचा खून केला. आरोपींनी दिलेले खुनाचे कारण फक्त निमित्त आहे. शामराव फडतरे हे माळकरी असल्याने ते निर्व्यसनी होते. नऊ गुंठे जमीन आपल्या नावावर करून देण्यासाठी पत्नी सुमन हिने तगादा लावला होता. त्यास ते नकार देत होते. यातून त्यांच्यात वारंवार वादावादी होत होती. जमीन आपल्या नावावर करून देण्यास नकार देणाऱ्या पतीचा कायमचा काटा काढण्यासाठी सुमनने बहिणीच्या मुलाची मदत घेतली.
शामराव फडतरे यांचे आई-वडील शेती करतात. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. त्यांना सहा भाऊ, आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर पाठोपाठ दोन भावांचे निधन झाले. त्यामुळे तिघे भाऊ स्वतंत्र राहात. ते इमारत बांधकामाची कामे घेत होते. १९९८ मध्ये त्यांचे तुरंबे (ता. राधानगरी) येथील सुमन हिच्याशी लग्न झाले. छोटेखानी कौलारू घरामध्ये त्यांचा संसार चांगला फुलला होता. त्यांचा मुलगा शंतून सध्या अकरावीमध्ये शिक्षण घेतो. शामराव हे मनमिळावू, लोकांमध्ये मिळून-मिसळून वागणारे असल्याने त्यांची वारकरी अशी ओळख पाचगाव परिसरात होती. सेंट्रींगच्या कामातून फावल्या वेळेत ते समाजसेवाही करीत होते. मानव सेवा संस्थेमध्ये सदस्य असल्याने ते बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नेहमी पुढाकार घेत होते. पाचगाव परिसरात ज्याला कोणी नाही त्याला शामराव मदतीचा हात देत होते. त्यामुळे त्यांच्याविषयी लोकांमध्ये आदर होता.
शामराव यांची पाचगाव परिसरात आठ गुंठे जमीन आहे. ती मोक्याची असल्याने आपल्या नावावर करण्यासाठी पत्नीने तगादा लावला होता. यातून त्यांच्यात नेहमी वादावादी होत होती. एकुलता एक मुलगा शंतनूच्या भविष्याचा ते विचार करीत होते. त्यामुळे ते पत्नीच्या नावे जमीन करण्यासाठी राजी नव्हते. जमीन मोक्याची असल्याने पत्नी सुमन व बहिणीचा मुलगा रणजित यांचा त्यावर डोळा होता. यातून त्यांनी खूनाचा कट रचला आणि बेंदरला जेवणासाठी गुडाळला येण्यासाठी रणजितने निमंत्रण दिले आणि तो प्रवास त्यांचा अखेरचा ठरला.
खुनानंतर पत्नीचा बिनधास्त वावर
शामराव यांच्या खुनानंतर पत्नी सुमन पाचगावमध्ये बिनधास्त वावरत होती. शामराव कुठे दिसत नसल्याने शेजारी राहणारे लोक, त्यांचे मित्र तिच्याकडे विचारपूस करीत होते. त्यावर ती कामावर गेलेले परत आलेले नाहीत, असे सांगत होती.
परिसरात हळहळ
शामराव फडतरे यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद कर्नाटक पोलिसांत आहे. त्यांचे नातेवाईक मिळून न आल्याने पोलिसांनी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. गेली दहा वर्षे बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या शामराव यांच्यावरही बेवारस म्हणून अंत्यसंस्कार झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Shamrao raid for nine gunthas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.