दिवस शनीचा.. गर्वाला दूर करण्याचा..पापक्षालनाचा!
By admin | Published: July 25, 2014 09:59 PM2014-07-25T21:59:20+5:302014-07-25T22:13:42+5:30
शनी अमावस्या शनिवारी
सातारा : ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ मानल्या जाणाऱ्या अनेक योगांपैकी एक असणारी शनी अमावस्या शनिवारी येत आहे. शनी-मारुतीच्या दर्शनाला या निमित्ताने गर्दी होईल. मात्र, पुराणकथांना आधुनिक संदर्भात पाहिल्यास हा दिवस पापक्षालन आणि गर्व दूर करण्याचा आहे, हे दर्शन घेणाऱ्यांनी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
शनीची मंंदिरे गावोगावी दिसत असली, तरी शनी आणि मारुतीची मंदिरे ठराविक गावांमध्येच आढळून येतात. साताऱ्यात अशी तीन मंदिरे आहेत. मारुती हा रुद्राचा म्हणजेच शंकराचा अवतार मानला गेला आहे. रावणाने नऊ ग्रहांना पायाखाली ठेवले, तेव्हा शनीची दृष्टी रावणावर पडली. रावणाला ताकदीचा गर्व झाला होता. मात्र, शनीची दृष्टी पडताच त्याचे ग्रह फिरले आणि विनाश सुरू झाला. शनिमाहात्म्यात सर्वच कथा गर्वहरणाच्या आहेत. शनी कुणाला गर्व होऊ देत नाही आणि झालाच तर त्याचं गर्वहरण करतो, असंं मानलं जातं. त्यावरूनच ‘साडेसाती’ ही संकल्पनाही रूढ झाली. या काळात शनी संबंधिताला एक ‘दान’ देतो आणि त्याचा विनियोग करताना गर्व होतोय का हे पाहून गर्वहरण करतो, असं मानतात. काही जण साडेसाती हा केलेल्या पापांबद्दल शिक्षा भोगण्याचा काळ मानतात.
शनी हा शिक्षा देणारा देव असल्यामुळं त्याची दृष्टी टाळण्याकडेच लोकांचा कल असतो. शनीचं दर्शनही समोरून कुणी घेत नाही, तर एका बाजूनं घेतात. त्याची दृष्टी आपल्यावर पडू नये, हाच यामागचा उद्देश. परंतु कथांचा सारांश लक्षात घेता आधुनिक काळात गर्व करू नये हे सांगणारं हे प्रतीक आहे आणि त्याची आठवण ठेवण्याचा दिवस म्हणून शनी अमावस्येकडे पाहायला हरकत नाही. (प्रतिनिधी)
शनी-मारुती एकत्र का?
शनी इतरांचं गर्वहरण करीत असला, तरी त्यालाही आपल्या शक्तीचा एकदा गर्व झाला. त्यानं थेट शंकरालाच त्रास दिला. रुद्राचा म्हणजे शंकराचाच अवतार असणाऱ्या मारुतीनं त्यावेळी शनीला काही काळासाठी आपल्या पायाखाली घेतलं, अशी कथा सांगितली जाते. किंबहुना शनी स्वत:च परिहार म्हणून मारुतीच्या पायाशी गेला. अर्थात नंतर मारुतीही शनीला शरण आला हे सांगून कथा सांगणाऱ्यांनी शनीचं श्रेष्ठत्व अबाधित ठेवलंय आणि गर्व करू नका असा संदेश दिलाय. कथांमध्ये रमण्यापेक्षा संदेश घेणंच श्रेयस्कर नव्हे का?