शंकराचार्य यांच्या वक्तव्याचा कोल्हापुरात निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 01:10 PM2024-02-05T13:10:49+5:302024-02-05T13:11:00+5:30

'मनुवादीचा पुरस्कार करणारे सत्तेवर आहेत. यामुळे शंकराचार्य यांच्यासारखे जातीव्यवस्थेचे समर्थन करण्याचे धाडस'

Shankaracharya Vidyanrisingh Bharti's statement in support of caste system protested in Kolhapur | शंकराचार्य यांच्या वक्तव्याचा कोल्हापुरात निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

शंकराचार्य यांच्या वक्तव्याचा कोल्हापुरात निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोल्हापूर : पुण्यातील एका कार्यक्रमात करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी जातीव्यवस्थेचे समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्या वक्तव्याविरोधात पुढील लढ्याची दिशा निश्चित करण्यासाठी बुधवारी दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात सायंकाळी पाच वाजता महाबैठकीचे आयोजन करण्याचा निर्णय रविवारी झाला. येथील शेकापच्या बैठकीत आम्ही भारतीय लोक आंदोलनतर्फे घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. शेकापचे शहर चिटणीस बाबुराव कदम अध्यक्षस्थानी होते.

कदम म्हणाले, मनुवादीचा पुरस्कार करणारे सत्तेवर आहेत. यामुळे शंकराचार्य यांच्यासारखे जातीव्यवस्थेचे समर्थन करण्याचे धाडस करीत आहेत. त्यांच्या विरोधातील चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. बुधवारी महाबैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करू.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी पुन्हा एकदा आपले गुण उधळले आहेत. शंकराचार्यांच्या चुकीच्या वक्तव्याचा टिकेच्या माध्यमातून सडकून काढले पाहिजे. भाजपची सत्ता आल्यापासून ते उघडपणे बोलू लागले आहेत. त्यांच्या प्रवृती विरोधात कोल्हापुरात लढा उभारावा लागेल.

काँग्रेसच्या नेत्या सरला पाटील म्हणाल्या, शंकराचार्यांचे हिंदुत्व चुकीचे आहे. आमचे हिंदुत्व समतेचे आहे. सुभाष देसाई म्हणाले, भावना दुखावल्याप्रकरणी शंकराचार्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. दिगंबर लोहार यांनी शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत राजर्षी शाहू महाराज यांचे विचार पोहोचवू असे सांगितले.

यावेळी भारती पोवार, अतुल दिघे, डी. जी. भास्कर, अनिल घाटगे, गिरीश फोंडे, सीमा पाटील, रमेश मोरे, संभाजीराव जगदाळे, रवी जाधव यांनीही बैठकीतील चर्चेत सहभाग घेतला. बाजीराव नाईक, माजी प्राचार्य टी. एस. पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Shankaracharya Vidyanrisingh Bharti's statement in support of caste system protested in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.